पैशाच्या पावसाचे धागेदोरे उलगडणार? रोहा पोलिसांची बेधडक कारवाई
शशिकांत मोरे
धाटाव : रोहा तालुक्यातील धामणसई हद्दीतील अघोरी जादूटोणा प्रकरण सबंध राज्यात चांगलेच गाजले. फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात हे काय चालले आहे, कायद्याचे राज्य आहे की नाही? असा संतप्त सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांसह अनेक संघटनांनी केला आहे. त्यातच शिंदे गटाचे शहरप्रमुख मंगेश रावकर यांनीही हा अघोरी विद्येचा प्रकार चक्क विद्येच्या सहवास असलेल्या शाळेत व्हावा, हे भयानक आहे, त्यामुळे शाळेच्या संबंधीतांना पहिले अटक करा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी रावकर यांनी केली होती. अंनिस, राजकीय पुढारी, पत्रकार यांचा दबाव वाढताच पैशाचा पाऊस भगतगिरी प्रकरणातील संशयीत मास्टर माईंड किरण धनवी व एका सहकाऱ्याला अखेर शुक्रवारी सकाळी अमानुष व अघोरी प्रथा जादूटोणा गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली. पैशाचा पाऊस भगतगिरी प्रकरणातील रत्नागिरीतील मुख्य म्होरक्या व त्याचा साथीदार अजून सापडले नाहीत. याबाबत उलटसुलट चर्चा असतानाच शाळा संबधीत किरण धनवी व एका सहकाऱ्याला अखेर अटक केल्याने पैशाच्या पावसाचे धागेदोरे अधिक उलगडणार, यामागे राजकीय व अन्य लोक आहेत का? किती लोकांची आर्थिक फसवणूक झाली? नरबळीचा प्रयोजन होते का? अशा अनेक धक्कादायक प्रश्नांची उत्तरे मिळतील असे रोहासह सबंध जिल्ह्यात बोलेले जात आहे.
धामणसई हद्दीत काळ्या अघोरी विद्येच्या जादूटोण्यातून पैशाचा पाऊस पाडण्याचे भगतगिरी प्रकरण शनिवारी उघडकीस आले. धामणसई येथील धाडसी तरुणांनी पैशाचा पाऊस, त्यासाठी नरबळीची शक्यता हे भयानक प्रकरण रोखले. यातील सहभागी आरोपी संतोष पालांडे, प्रदीप पवार, प्रवीण खांबल, सचिन सावंतदेसाई, दीपक कदम, मिलिंद साळवी सर्व राहणार रत्नागिरी व राजेंद्र तेलंगे राहणार हेटवणे रोहा यांना ग्रामस्थांनी पकडून रोहा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या सर्व गावकरी ग्रामस्थ, तरुणांच्या धाडसाचे जिल्हा, राज्यात कौतुक झाले. याचवेळी भगतगिरीतील म्होरक्या व त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले. अघोरी विद्येतील पैशाच्या पावसासाठी चक्क विद्येचे ठिकाण लहान मुलांची शाळा वापरण्यात आली. शाळेत काळी बाहुली यांसह सर्वच जादूटोण्यातील पुरावे मिळाले. यातील भगत हा शनिवारी रात्री स्मशानात नग्नपुजा करणार होता. त्याचवेळी शाळेत बसलेल्या सर्व आरोपींना पैशाच्या पावसातून रग्गड पैसा मिळणार होता. त्यासाठी आरोपींनी भगतासाठी लाखो रुपये मोजल्याचे समोर आले आहे.
हे धक्कादायक प्रकरण जिल्हा, राज्यात गाजले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दखल घेतली. पैशाचा पाऊस प्रकरणातील आरोपींना ताब्यात घ्या, नेमका प्रकार काय, शाळेचा वापर का करण्यात आला, असा दबाव पोलिसांवर वाढला. त्याचवेळी शाळेचा प्रमुख किरण धनवी हा संशयीत म्हणून चर्चेत आला. त्याच्याच बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये पैशाचा पाऊस पाडणारा जालीम भगत काही दिवस राहत होता. याही चर्चेने किरण धनवी प्रत्यक्ष सहभागी असावा, त्यातच अघोरी विद्येसाठी शाळा का वापरायला दिली, अशा सर्वच धाग्यादोऱ्यासाठी अखेर शुक्रवारी सकाळी किरण धनवी याला रोहा पोलिसांनी अटक केल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी सांगितले.
काळ्या कांड्या पूजा प्रकरण अधिक व्यापक असल्याचा संशय आता व्यक्त होत आहे. राज्य, जिल्ह्यात सर्वच भागात अघोरी विद्या अधिकच फोफावत आहे. काही वर्षापासून धामणसई, वांगणी परिसरात भगतगिरीला जोश आल्याचे बोलले जाते. अशिक्षीत सामान्य लोकांसह उच्चशिक्षीत श्रीमंत लोकही काळ्या विद्येला शरण जातात. तालुक्यातील राजकीय पटलावरील यशस्वी नेत्याचेही अनेकदा काळ्या कांड्या पूजा केल्याच्या आठवणीला चांगलाच उजाळा मिळाला. याच सर्व घडामोडीत धामणसई हद्दीत अघोरी काळ्या कांड्या भयानक प्रकार ग्रामस्थांनी थांबविला. कदाचित नरबळीसारखा अनर्थ घडला असता, त्यातूनच रोहा पोलिसांवर चोहोबाजूने दबाव वाढताच शुक्रवारी सकाळी काळया जादूटोण्यातील पैशाच्या पावसासाठी शाळेचा वापर करायला देणाऱ्या मास्टर माईंड किरण धनवी याला अखेर अटक करण्यात आल्याने जादूटोण्यासंबंधी आता काय काय माहिती समोर येते, मुख्यत: नरबळीसारखा प्रकार घडणार होता का ? हेही समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तरीही अघोरी विद्येतून पैशाचा पाऊस पाडणाऱ्या म्होरक्याला शोधण्यात रोहा पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. मात्र, पैशाचा पाऊस प्रकरणातील बहुचर्चित मास्टरमाईंड किरण धनवी याला अटक केल्याने भगतगिरीतील अनेक धागेदोरे हाती लागणार असल्याचे बोलले जाते. भगतगिरीतील जालीम भगत व साथीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धनवी याची अटक महत्त्वाची मानली जाते. आता पैशाचा पाऊस भगतगिरीतील काय काय माहिती समोर येते, जालीम भगताला नेमकी कधी अटक होते, जादूटोणासंबंधी प्रकरणाची अधिक व्याप्ती काय? याकडे रोहा, जिल्ह्यासह संबंध राज्याचे लक्ष लागले आहे.