• Thu. Feb 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आंबेनळी घाटात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्येचा संशय

ByEditor

Feb 26, 2026

महाड । मिलिंद माने
पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाट परिसरात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह एका मोरीत कोंबून ठेवण्यात आला होता. प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या असून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

असा उघड झाला प्रकार

आंबेनळी घाटात सध्या रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परिसरात तीव्र दुर्गंधी जाणवू लागल्याने त्यांनी शोध घेतला. रस्त्यालगत असलेल्या एका मोरीत डोकावून पाहिले असता, त्यांना एका महिलेचा छिन्नविच्छिन्न आणि अर्धवट जळालेला मृतदेह दिसून आला. कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलादपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वय अंदाजे २८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. मृतदेहाची अवस्था पाहता, तिची अन्यत्र कुठे तरी हत्या करून ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट व्हावा, या हेतूने मृतदेह घाटातील निर्जन ठिकाणी आणून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक व्हॅन आणि तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. घाटातील आणि चेकपोस्टवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

गेल्या काही दिवसांत परिसरातून किंवा शेजारच्या जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या महिलांच्या तक्रारींची माहिती पोलीस घेत आहेत. मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण

आंबेनळी घाट हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत गजबजलेला मार्ग आहे. मात्र, अशा प्रकारच्या धक्कादायक घटनेमुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी आणि या गुन्ह्याचा छडा लवकरात लवकर लावावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. पोलादपूर पोलीस या प्रकरणाचा युद्धपातळीवर तपास करत असून लवकरच आरोपींना जेरबंद करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!