महाड । मिलींद माने
महाड शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदाचा कार्यभार पोलीस निरीक्षक संदीप अशोक भोसले यांनी स्वीकारला आहे. बदलीवरून नाराजी व्यक्त करत वरिष्ठांच्या कथित छळाला कंटाळून आत्महत्येचा इशारा देणारे मावळते पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांची ठाणे ग्रामीण भागात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी आता भोसले यांची नियुक्ती झाली आहे.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदीप भोसले हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून, कोणत्याही पोलीस पार्श्वभूमीशिवाय त्यांनी स्वकर्तृत्वावर पोलीस दलात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांना पोलीस सेवेचा तब्बल २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, २०१७ पासून ते पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागासह पुणे ग्रामीण, नाशिक, नागपूर आणि रायगडमधील कर्जत येथे विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सलग १० वर्षे उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल २६ जानेवारी २०२५ रोजी त्यांना ‘पोलीस महासंचालक पदक’ देऊन गौरविण्यात आले आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर संदीप भोसले यांनी महाड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आगामी शिवजयंती, होळी आणि ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्याचे आवाहन करत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
