• Thu. Feb 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

थेरोंडा मंदिरफोडी प्रकरणातील आरोपीला १ वर्ष सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल

ByEditor

Feb 26, 2026

रेवदंडा । सचिन मयेकर
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेरोंडा परिसरात झालेल्या मंदिरफोडी प्रकरणातील आरोपीला अलिबाग न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी महेश नंदकुमार चायनाखवा (वय ३८, रा. थेरोंडा, आगल्याची वाडी) याला भारतीय दंड विधान कलम ३८० व ४५७ अन्वये प्रत्येकी १ वर्ष सश्रम कारावास आणि एकूण ४,००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

२०२३ मध्ये आरोपीने थेरोंडा गावातील पाच पाढे कोळी समाजाच्या खंडोबा मंदिराचे दरवाजे उघडून आत प्रवेश केला होता. तेथून त्याने देव्हाऱ्यातील चांदीच्या मूर्तींचे टाक आणि लोलक असा एकूण ९४,८०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याव्यतिरिक्त, त्याने आगल्याची वाडी येथील मुंबईकर आणि ढोलके कुटुंबीयांच्या कुलदेवतांच्या रूमची कडी तोडून चांदीचा मुखवटा व मूर्तींचे टाक चोरले होते. अशा प्रकारे धार्मिक स्थळांमधून एकूण १,६०,८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री. बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोसई श्री. डी. जे. म्हशिलकर व पोनि श्री. देविदास मुपडे यांनी या गुन्ह्याचा तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपास केला. पोलिसांनी केवळ आरोपीला अटकच केली नाही, तर चोरीला गेलेला संपूर्ण १,६०,८०० रुपये किमतीचा चांदीचा मुद्देमाल जप्त केला.

जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादी गोरक्षनाथ लक्ष्मण नवरीकर (रा. थेरोंडा) यांना रीतसर परत करण्यात आला आहे. संबंधित मंदिरे आणि कुलदैवतांची व्यवस्था स्थानिक ट्रस्टमार्फत पाहिली जाते. चोरी गेलेला धार्मिक ठेवा सुखरूप परत मिळाल्याने आणि आरोपीला शिक्षा झाल्याने थेरोंडा ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!