• Wed. Feb 25th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागालँड राज्य सहकारी बँक व सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रायगड जिल्हा सहकारी बँकेला अभ्यास भेट

ByEditor

Feb 25, 2026

अलिबाग । सचिन पावशे
भारत सरकारच्या अॅक्ट ईस्ट पॉलिसी अंतर्गत उत्तर-पूर्व भारताला दक्षिण-पूर्व आशिया खंडासमवेत मुख्यभूमी (land-based) मार्गाने जोडण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. विशेषतः नागालँड,मणिपूर व इतर सीमावर्ती राज्ये ही भारताची “गेट वे टू एशियन” म्हणून विकसित करण्याचा केंद्राचा दृष्टिकोन आहे. या पार्श्वभूमीवर मजबूत, तंत्रज्ञानाधारित आणि पारदर्शक सहकारी बँकिंग व्यवस्था उभारणे अत्यावश्यक मानले जात आहे. याच उद्देशाने नागालँडमधील सहकारी क्षेत्रामधील १० वरिष्ठ अधिकारी आणि संचालकांच्या समितीने रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या प्रगत आयटी प्रणाली, संस्था संगणकीकरण व व्यवसाय विविधीकरणाच्या अनुभवाचा अभ्यास केला. मुख्यभूमी (मेनलँड) कनेक्टिव्हिटीच्या वाढत्या संधींचा लाभ घेण्यासाठी उत्तर-पूर्व सहकारी बँकिंग क्षेत्राला आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याची दिशा या भेटीतून स्पष्ट झाल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.या भेटीत त्यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्याशी सखोल चर्चा केली. यावेळी बँकेचे प्रशासन विभाग प्रमुख अजित भगत, कर्ज विभाग प्रमुख संजीव देशमुख, आयटी विभागप्रमुख नीलेश कदम अकौंट्स विभाग प्रमुख महेंद्र माळी,गजानन हावरे, विभागीय अधिकारी संदेश पाटील,राजेंद्र जुईकर हे उपस्थित होते.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नाबार्ड तपासणीत अ वर्ग दर्जा प्राप्त झाला असून महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये हा मान मिळवणारी ती एकमेव बँक ठरली आहे, सोबतीला मजबूत आर्थिक शिस्त, पारदर्शक लेखापद्धती व सक्षम जोखीम नियंत्रण ही या यशामागील प्रमुख कारणे आहेत. बँकेने आयटी क्षेत्रात मोठी झेप घेत कोअर बँकिंग सोल्युशन मोबाईल बँकिंग अॅप, एसएमएस अलर्ट, एटीएम/रुपे कार्ड व UPI/AEPS सारख्या डिजिटल सेवा प्रभावीपणे राबवल्या आहेत. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा संस्थांचे संगणकीकरण पूर्ण करणारी देशातील पहिली जिल्हा बँक बनून डिजिटल खाते व्यवस्थापन, ऑनलाईन कर्ज वितरण-वसुली व सदस्य डेटाबेस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. बँकेने कृषी कर्जापुरते मर्यादित न राहता लघुउद्योग, गृहनिर्माण, वैयक्तिक व व्यापारी कर्ज तसेच ठेवी वाढ व गुंतवणूक योजनांद्वारे व्यवसाय विविधीकरण साधण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमुळे रिअल-टाईम व्यवहार, पारदर्शकता व कार्यक्षमता या सर्व बाबींविषयी नागालँडच्या अधिकाऱ्यांना आवश्यक,माहितीपूर्ण व व्यावहारिक शिक्षण मिळाल्याचे त्यांनी समाधानाने नमूद केले, शिवाय बँकेने ३१ जानेवारी २०२६ अखेर आपला व्यवसाय ७३५० कोटीपर्यंत नेल्याबद्दल बँकेचे कौतुक केले.

या भेटीदरम्यान आयोजित चर्चासत्रात दोन्ही राज्यांतील सहकारी बँकिंग व्यवस्थेमधील साम्य व आव्हाने यावर चर्चा झाली. नागालँडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रायगड डीसीसी बँकेच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करत, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्याकडे उत्तर-पूर्व भारतातील सहकारी बँकिंग क्षेत्राच्या विकासासाठी हे मॉडेल उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.तसेच बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील आणि संचालक मंडळ यांनी नागालँड आणि ईशान्य भारतामधील सहकारी संस्थांना भेट देवून मार्गदर्शन करण्याची विनंती केली.

दोन दिवसांच्या या भेटीमध्ये बँकेचे केंद्र कार्यालय, विविध शाखा आणि सहकारी संस्था या ठिकाणी या सर्व अधिकार्‍यानी भेटी दिल्या, यावेळी बँकेचे सीनियर मॅनेजर संदीप जगे यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली. रायगड डीसीसी बँकेने तंत्रज्ञान, पारदर्शकता व बहुआयामी व्यवसाय मॉडेलच्या आधारे सहकारी क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. नागालँडमध्येही अशाच सुधारणांद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देता येईल,” असे मत या भेटीच्या दरम्यान नागालँड राज्य सहकारी बँकेचे वरिष्ठ संचालक इंप्तीयेम्बा लोंगकुमेर यांनी नोंदविले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!