अलिबाग न्यायालयाने सुनावला निकाल; ६० हजारांचा दंड
अलिबाग । प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील कुरुळ टेकडीवर पाच वर्षांपूर्वी झालेल्या गोळीबार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर ऊर्फ लालदेव चव्हाण याला अलिबाग सत्र न्यायालयाने मंगळवारी ‘आजन्म कारावास’ आणि ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच मित्रांच्या मदतीने हा कट रचल्याचे तपासात सिद्ध झाले आहे.
नेमकी घटना काय?
३१ मार्च २०१९ रोजी रात्री ही खळबळजनक घटना घडली होती. फिर्यादी जितेंद्र मगर आणि त्याचे सहकारी कुरुळ येथील टेकडीवर पार्टीसाठी गेले होते. मध्यरात्री पार्टी आटपून घरी परतत असताना, वाटेत दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर पिस्तुलातून बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात सागर पाटील आणि गौरव भगत हे दोघे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान सागर पाटील याचा मृत्यू झाला होता.
अलिबाग पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून मृताच्या सख्ख्या भावाने (राजेंद्र मगर) आपल्या मित्रांच्या मदतीने हा हत्येचा कट रचला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ संतोष भगत यांच्या न्यायालयात पार पडली. सरकारी अभियोक्ता म्हणून जिल्हा सरकारी वकील संतोष पवार यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या खटल्यात जखमी साक्षीदाराची साक्ष, तपासी अंमलदारांनी सादर केलेले पुरावे, फिर्यादीची जबानी या सर्व बाबी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी समीर ऊर्फ लालदेव चव्हाण याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
