• Tue. Feb 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावरील पुई स्टॉपचे गतिरोधक ठरतायत ‘डेथ ट्रॅप’; आठ दिवसांत ४ अपघात

ByEditor

Feb 24, 2026

कोलाड । विश्वास निकम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पुई स्टॉप येथील गतिरोधक सध्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असून, अपघातांचे केंद्र बनले आहेत. गेल्या आठ दिवसांत या ठिकाणी ३ ते ४ गंभीर अपघात झाले असून, प्रशासनाच्या नियोजित शून्य कामामुळे एखाद्या निष्पाप प्रवाशाचा बळी गेल्यावरच जाग येणार का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.

तांत्रिक नियमांचे उल्लंघन

रस्ते विकास महामंडळाच्या नियमांनुसार, गतिरोधकाची उंची ६ ते ८ इंचांपेक्षा जास्त नसावी आणि त्याची रुंदी ३.६ मीटर असणे आवश्यक आहे. मात्र, पुई स्टॉप येथील गतिरोधकांची उंची प्रमाणाबाहेर जास्त असून ते एकमेकांना खेटून बांधण्यात आले आहेत. उंची जास्त असल्याने वाहने जोरात आदळतात, ज्यामुळे चेसिस आणि इंजिनचे नुकसान होत आहे. अचानक बसणाऱ्या झटक्यांमुळे दुचाकीस्वार आणि चालकांना मणक्याचे आजार जडत आहेत. गतिरोधकांवरील पांढरे पट्टे घर्षणाने पुसले गेले आहेत, परिणामी रात्रीच्या वेळी वेगात येणाऱ्या चालकांना गतिरोधकाचा अंदाज येत नाही.

होळीच्या पार्श्वभूमीवर चिंतेचे वातावरण

कोकणचा मोठा सण असलेल्या ‘होळी’साठी लाखो चाकरमानी खाजगी वाहनाने गावाकडे रवाना होत आहेत. पुढच्या चार दिवसांत वाहतुकीचा ओघ प्रचंड वाढणार आहे. अशा स्थितीत हे गतिरोधक अधिक घातक ठरण्याची शक्यता आहे. अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी गतिरोधकाची उंची कमी करून ‘सावधान’ असे फलक आणि सिग्नल बसवण्याची मागणी जोर धरत आहे.

“चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पुई स्टॉप जवळील गतिरोधकांची उंची तातडीने कमी करणे गरजेचे आहे. तसेच गतिरोधकाच्या ४० मीटर आधी सूचना फलक लावून त्यावर रिफ्लेक्टर पट्टे मारावेत, अन्यथा मोठ्या अपघाताची जबाबदारी प्रशासनाची असेल.”
—दिनकर सानप,
सामाजिक कार्यकर्ते, पुई.

प्रशासनाकडून गतिरोधकांवर पुन्हा पांढरे/पिवळे रिफ्लेक्टर पट्टे मारणे, दोन्ही बाजूंना ४० मीटर अंतरावर सूचना फलक लावणे, या ठिकाणी तातडीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे या उपाययोजना होणे अपेक्षित आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!