दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा; आरोपींना अटक करून दागिने व रोख रक्कम केली हस्तगत
माणगाव | सलीम शेख
आपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या माणगाव पोलिसांनी दोन वेगवेगळ्या चोरीच्या प्रकरणांत मोठी यशस्विता मिळवली आहे. कौशल्याने तपास करत पोलिसांनी आरोपींना अटक करून घरफोडीत चोरीला गेलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आणि दि. २५ फेब्रुवारी रोजी तो मूळ मालकांना सन्मानाने परत केला.
शेजारणीनेच मारला होता डल्ला
विद्यानगर येथील सिद्धी कॉम्प्लेक्समध्ये ७ ऑगस्ट २०२५ रोजी रवींद्र सोनू पादीर यांच्या घरात मोठी चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. नरेंद्र बेलदार, पो.ह. सूरज फडताडे व पो.शि. युवराज दहिफळे यांनी केला. तपासादरम्यान त्याच इमारतीत राहणारी आरोपी कोमल गणेश महाडिक हिला अटक करण्यात आली.
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण ८,६१,००० रु.):
- ७१.५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत २,८६,००० रु.)
- ७.२५० ग्रॅमचा नेकलेस (किंमत ८०,००० रु.)
- ५.९५० ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा (किंमत २३,००० रु.)
- २२,००० रुपये रोख रक्कम.
लोणशी येथील चोरीचा छडा
दुसऱ्या घटनेत, २३ नोव्हेंबर २०२३ रोजी लोणशी येथील दिनेश मधुकर केकाणे यांच्या घरात चोरी झाली होती. पो.स.ई. आघाव व पो.शि. विकास ढाकणे यांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून दापोली येथील आरोपी संकेत मुकुंद अजर्लेकर याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ६४,३०० रुपये किमतीचे सोन्याचे कानाचे नक्षीदार जोड हस्तगत करण्यात आले.
दि. २५ फेब्रुवारी रोजी माणगाव पोलीस ठाण्यात दोन्ही फिर्यादींना (रवींद्र पादीर व दिनेश केकाणे) पाचारण करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा मुद्देमाल त्यांना सुपूर्द करण्यात आला. आपले हक्काचे दागिने आणि पैसे परत मिळाल्याने फिर्यादींनी पोलिसांचे आभार मानले. माणगाव पोलिसांनी दाखवलेले हे तपास कौशल्य आणि तत्परता यामुळे परिसरात पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
