श्वानदंशाच्या लसीसाठी रुग्णांची वणवण; १५ वर्षांपासून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव कागदावरच
उरण | विठ्ठल ममताबादे
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली तरी उरण तालुक्याचा आरोग्य प्रश्न आजही अधांतरीच आहे. तालुक्यातील एकमेव महत्त्वाचे असलेल्या इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालयात सध्या औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांना उपचारांविना ताटकळत राहावे लागत आहे. विशेषतः श्वानदंशावरील (अँटी-रेबीज) लसींचा साठा अपुरा असल्याने नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
श्वानदंशाच्या घटनांत वाढ; लस मात्र बेपत्ता
उरण शहरात दरमहा ३५० पेक्षा अधिक श्वानदंश होण्याच्या घटना घडत आहेत. अशा वेळी ‘अँटी रेबीज’ लस तातडीने मिळणे अनिवार्य असते. मात्र, रुग्णालयात या लसीचा पुरेसा साठा नसल्याने दर आठवड्याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाकडून औषधे मागवावी लागत आहेत. श्वानदंशासोबतच धनुर्वात प्रतिबंधक (T.T.) इंजेक्शनचाही तुटवडा असल्याने गरीब रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे.
३० खाटांचे रुग्णालय आणि ३०० रुग्णांचा भार
३५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या ३० खाटांच्या रुग्णालयात दररोज ३०० हून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. खासगी रुग्णालयांचे उपचार परवडत नसल्याने सामान्य नागरिक शासकीय रुग्णालयाची पायरी चढतात, मात्र तिथे गेल्यावर औषधे उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळते. वेळेवर उपचार न मिळाल्याने काही वेळा रुग्णांना जीव गमावण्याची वेळ आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.
प्रशासनाची उदासीनता: उपजिल्हा रुग्णालय फक्त नावालाच?
उरणमधील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी २०१० मध्ये शासनाने १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी दिली होती. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून या नवीन रुग्णालयाचा आराखडा आणि अंमलबजावणी प्रतिक्षेत आहे. अत्याधुनिक सुविधा नसल्याने उरणकरांना आजही पनवेल, नवी मुंबई किंवा मुंबईतील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. आपत्कालीन स्थितीत ही धावपळ रुग्णांच्या जिवावर बेतणारी ठरत आहे.
“काही दिवसांपासून ‘अँटी रेबीज’ औषधांचा साठा पुरेसा नव्हता. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून औषधे मागविण्यात येत आहेत. श्वानदंशाच्या घटना वाढल्याने व्यवस्थेवर ताण आहे, तरीही रुग्णांना वेळेत औषधे उपलब्ध करून देण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.”
— डॉ. बाबासाहेब काळेल,
अधीक्षक, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय
उरणकरांच्या प्रमुख मागण्या:
- अँटी रेबीज आणि टी.टी. लसींचा नियमित पुरवठा व्हावा.
- मंजूर असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने सुरू करावे.
- रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ आणि तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी.
