जेवणाच्या सुटीच्या नावाखाली तासनतास काउंटर बंद; ज्येष्ठ नागरिक, शेतकऱ्यांचे हाल
उरण (घन:श्याम कडू): उरणमधील विविध बँका आणि सहकारी पतसंस्थांमध्ये सध्या ग्राहकांची अक्षरशः थट्टा सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बँकेची अधिकृत वेळ एक आणि कर्मचाऱ्यांची कामाची वेळ दुसरी, असा अजब आणि मनमानी कारभार शहरात उघडपणे सुरू आहे. कामाच्या वेळेत कर्मचारी जागेवर नसणे आणि तासनतास काउंटर बंद ठेवले जात असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत.
‘लंच ब्रेक’च्या नावाखाली दीड तास गायब
शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसह अनेक सहकारी संस्थांमध्ये दुपारी ‘जेवणाची सुटी’ (Lunch Break) या नावाखाली कर्मचारी दीड-दीड तास बाहेर फिरताना दिसतात. नियमानुसार बँकांचे व्यवहार दुपारी ३:३० पर्यंत सुरू असणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात दीड वाजल्यापासूनच काउंटरवर ‘कुलूप’ लावून कर्मचारी जेवणाच्या आस्वादात मग्न असतात. यामुळे लांबून आलेले शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि व्यापाऱ्यांना तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण मौन?
“बँक सुरू आहे” असा फलक बाहेर असताना आत मात्र सेवा ठप्प असणे, ही ग्राहकांची शुद्ध फसवणूक असल्याचे बोलले जात आहे. ग्राहकांच्या पैशांवर चालणाऱ्या या बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची मर्जी चालते का, असा सवाल उपस्थित होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा सर्व प्रकार सुरू असताना वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे सोयीस्कर डोळेझाक करत आहेत. या बेफिकीरीला अधिकाऱ्यांची मुकसंमती आहे का? असा संशय आता नागरिक व्यक्त करत आहेत.
आंदोलनाचा इशारा
उरणकरांच्या संयमाची आता परीक्षा पाहू नका, असा इशारा संतप्त ग्राहकांनी दिला आहे. बँक प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी; अन्यथा हक्काच्या सेवेसाठी ग्राहक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा पवित्रा उरणमधील नागरिकांनी घेतला आहे.
