• Fri. Feb 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात

ByEditor

Feb 27, 2026

डेटा ऑपरेटरचा पगार थकित, लॉगिन वापराबाबत प्रश्नचिन्ह

श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेमध्ये प्रशासनाच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी बाब समोर आली आहे. पुरवठा शाखेत डेटा ऑपरेटर म्हणून स्थानिक तरुणीची नेमणूक S2 Infotech International Limited या खासगी कंपनीमार्फत करण्यात आली होती. मात्र संबंधित कंपनीने अचानक काम बंद करत तीन ते चार महिन्यांचा पगार न देता सेवा थांबवल्याचे सांगितले.

या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित खासगी कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पुरवठा शाखेतील संबंधित अधिकाऱ्यांनी कामाचा ताण असल्याचे सांगत पगाराची हमी न देता त्या तरुणीकडून काम सुरू ठेवण्यास सांगितल्याचेही समोर आले आहे.

पगार न मिळाल्यामुळे संबंधित तरुणीने अखेर कामावर जाणे बंद केले. मात्र सध्या पुरवठा अधिकाऱ्यांच्या टेबलवरील संगणक बंद अवस्थेत दिसत असतानाही कार्यालयीन काम सुरळीत सुरू असल्याचे सांगितले जात आहे. नक्की काम कसे आणि कुठून होत आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

शासकीय कामकाजात लॉगिन व डेटा सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर मानला जात असल्याने या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच थकीत पगाराबाबत संबंधित तरुणीला न्याय मिळावा आणि खासगी एजन्सीद्वारे होणाऱ्या नियुक्ती प्रक्रियेवर नियंत्रण ठेवावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!