• Tue. Mar 3rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण तालुक्यातील बोर्वे गावात अज्ञात समाजकंटकांचा धुमाकूळ; घरांवर दगडफेक करून आर्थिक नुकसान

ByEditor

Mar 3, 2026

पेण (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बोर्वे गावात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात समाजकंटकांनी उच्छाद मांडला असून, रात्रीच्या सुमारास घरांच्या छतावर दगडफेक करून आर्थिक नुकसान केले जात आहे. २६ फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा प्रकार अद्याप सुरूच असून, अजूनही घरांवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, बोर्वे गावातील ठराविक घरांना लक्ष्य करून रात्री १ ते पहाटे ४ च्या दरम्यान अज्ञातांकडून मोठे दगड मारले जात आहेत. पहाटेच्या सुमारास मोठे दगड घरांवर भिरकावण्यात येत असून, दगडफेक करणारे इसम अंधाराचा फायदा घेऊन पळ काढत असल्याने त्यांना पकडणे कठीण होत आहे.

​सौर ऊर्जा पॅनेल आणि छताचे नुकसान

​या दगडफेकीमुळे घरांवरील सिमेंटचे पत्रे फुटले असून, काही घरांच्या छतावर बसवण्यात आलेल्या सौर ऊर्जा (Solar Energy) पॅनेलचे देखील नुकसान करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होत आहे. घरांचे नुकसान करण्याच्या या हेतूपुरस्सर कृत्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे.

​या गंभीर विषयावर गावचे ग्रामस्थ आणि पंच कमिटीची तातडीची बैठक पार पडली होती. यावेळी अशा कृत्यांपासून परावृत्त होण्यासाठी समज देण्यात आली होती. मात्र, या बैठकीचा समाजकंटकांवर कोणताही परिणाम झालेला दिसून आला नाही. उलट पुन्हा पुन्हा होत असलेल्या दगडफेकीमुळे हे कृत्य जाणीवपूर्वक केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

​या सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या दीपश्री दीपक गावंड आणि अन्य पीडित रहिवाशांनी वडखळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला तक्रारदाराने अर्जात नमूद केल्यानुसार, शस्त्रक्रियेमुळे त्यांना घराबाहेर पडून पाठलाग करणे शक्य होत नाही, ज्याचा फायदा हे गुन्हेगार घेत आहेत.

​या समाजकंटकांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी बोर्वे ग्रामस्थांकडून रायगड पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!