• Thu. Mar 5th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धनमध्ये वाहतूक कोंडी अन् मद्यधुंद चालकांवर ‘खाकी’ची नजर; शहरात लवकरच ‘वन-वे’ अंमलबजावणी

ByEditor

Mar 5, 2026

पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या उपस्थितीत बैठक; दिवेआगरमध्येही वाहतुकीचे नियम कडक करण्याची मागणी

​श्रीवर्धन | अनिकेत मोहित
श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांच्या वाढत्या संख्येसोबतच मद्यधुंद वाहनचालकांमुळे होणारे अपघात आणि शहरातील गुंतागुंतीची वाहतूक कोंडी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी श्रीवर्धन येथील पतंगे रिसॉर्टमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मद्यधुंद चालकांवर कठोर कारवाई आणि शहरात ‘एकदिशा मार्ग’ (One Way) लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

​मद्यपी चालकांसाठी ‘चेकपोस्ट’ सज्ज

​गेल्या काही काळात मद्यधुंद पर्यटकांच्या वाहनांमुळे झालेल्या अपघातांत स्थानिकांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी कडक पावले उचलली आहेत.

​ब्रेथलायझर तपासणी: जसवली फाटा आणि वडवली फाटा येथे विशेष चेकपोस्ट उभारले जाणार आहेत.

​कायदेशीर कारवाई: ब्रेथलायझरद्वारे मद्यपान केल्याचे सिद्ध झाल्यास आणि वाहनात अवैध मद्यसाठा आढळल्यास चालकावर त्वरित गुन्हे दाखल केले जातील.

​शहरातील वाहतूक कोंडीवर ‘वन-वे’चा उतारा

​श्रीवर्धन शहरातील वाढती गर्दी पाहता, नगरपरिषद आणि पोलीस दलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते टिळक रस्ता या मार्गावर लवकरच एकदिशा वाहतूक (One Way) व्यवस्था लागू केली जाणार आहे.

​अतिक्रमणांवर हातोडा: रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना ताकीद देण्यात आली आहे. भाजी आणि मच्छी विक्रेत्यांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या गाळ्यांतच बसणे बंधनकारक असेल.

​पोलीस बंदोबस्त: वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस, दोन पोलीस अंमलदार आणि होमगार्ड्सची नियुक्ती करण्यात येणार आहे.

​दिवेआगरमध्येही नियम कडक करण्याची मागणी

​दिवेआगरमधील अरुंद रस्त्यांमुळे सुट्टीच्या दिवशी होणारी कोंडी लक्षात घेता, तेथेही ‘वन-वे’ सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच, रात्री १० वाजेनंतर नियमबाह्यरीत्या सुरू राहणाऱ्या बीअर बार आणि शॉप्सवर कारवाई करण्याची आग्रही मागणी बैठकीत करण्यात आली.

​’पोलीस जनतेसाठीच, तपास निःपक्षपाती’

​काही दिवसांपूर्वी झालेल्या एका अपघातात राजकीय दबावाखाली तपास होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. यावर स्पष्टीकरण देताना अधीक्षक दलाल म्हणाल्या की, “पोलीस प्रशासन जनतेच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे. कोणत्याही प्रकरणाचा तपास पूर्णपणे निःपक्षपातीपणे केला जातो, त्यावर कोणताही राजकीय दबाव नाही.”

​या बैठकीला पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड (श्रीवर्धन), सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी (दिघी सागरी), सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे (म्हसळा) यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, व्यापारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!