• Fri. Mar 6th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ग्रामपंचायत कार्यालयात ४ हजारांची लाच घेताना अधिकारी रंगेहाथ जेरबंद

ByEditor

Mar 6, 2026

घरबांधणीच्या कामात अडथळा न आणण्यासाठी मागितली होती लाच; अँटी करप्शन ब्युरोची धडक कारवाई

म्हसळा । वैभव कळस
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या लाचखोरीला अखेर चाप बसला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत दोन अधिकाऱ्यांना ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे पंचायत विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गट ग्रामपंचायत खारगांव खुर्द ता. म्हसळा, जि. रायगड येथील कृषी अधिकारी लक्ष्मण लक्ष्मण कांबळे (वय ४४) आणि ग्रामपंचायत अधिकारी कोमल निवृत्ती बेनवाड (वय ३६) यांनी एका तक्रारदाराकडून घरबांधणीच्या कामात अडथळा न आणण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने या प्रकाराची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड-अलिबाग कार्यालयाला दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. पडताळणीदरम्यान आरोपींनी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास होकार दिला.

यानुसार ५ मार्च २०२६ रोजी गट ग्रामपंचायत कार्यालय, खारगांव खुर्द येथे सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून ४ हजार रुपये घेताना दोन्ही आरोपींना ACB च्या पथकाने रंगेहाथ पकडले.

या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अपर पोलीस अधीक्षक श्याम नवनाथ आणि श्रीकांत शिंदे यांनी केले. तर सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

दरम्यान सरकारी कामासाठी लाच मागणाऱ्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!