• Thu. Jul 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे पेण तालुक्यातील खरोशी, दुरशेत गावांमध्ये अन्नधान्याचे वाटप; पूरग्रस्तांना मोठा दिलासा

ByEditor

Jul 16, 2026

विनायक पाटील
पेण :
सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच समाजहितैषी कामात आघाडीवर असणाऱ्या ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या पेण तालुक्यातील मावळ्यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे आणि कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच तालुकाध्यक्ष रोहित केणी यांच्या पुढाकाराने पेण तालुक्यातील अतिवृष्टी व पूरबाधित दुरशेत आणि खरोशी या गावांमध्ये जाऊन नागरिकांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये दुरशेत आणि खरोशी या गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला. या गावांमधील जवळपास ७० टक्के नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्यासह साठवून ठेवलेले अन्नधान्य संपूर्णपणे भिजले होते. त्यामुळे येथील कुटुंबांचे अतोनात हाल होत होते.

एकीकडे शासनाकडून नुकसानभरपाईसाठी पंचनामे सुरू असले, तरी प्रत्यक्षात मदत कधी मिळणार याबाबात नागरिकांमध्ये साशंकता होती. हीच निकड ओळखून सह्याद्री प्रतिष्ठानच्या शेकडो मावळ्यांनी थेट पूरग्रस्त भागात धाव घेतली. प्रतिष्ठानतर्फे बाधित कुटुंबांना कांदे, बटाटे, तेल, मसाले, मीठ, तांदूळ, डाळ, खोबरे, लसूण आणि हळद यांसारख्या दैनंदिन जेवणासाठी लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. ऐन संकटकाळात प्रतिष्ठानने दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि सामाजिक जाणीवेमुळे पूरग्रस्त ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!