• Thu. Jul 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड-दापोली मार्गावर अपघातांचे सत्र सुरु; एसटी बस घसरली, सुदैवाने जीवितहानी टळली

ByEditor

Jul 16, 2026

मिलिंद माने
महाड :
महाड-दापोली राज्य मार्गावर पावसाळा सुरू होताच पुन्हा एकदा अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. आज दुपारी मुंबई सेंट्रल आगाराची फौजी अंबवडे-मुंबई ही एसटी बस रस्त्यावरून घसरून अपघातग्रस्त झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या राज्य मार्गाच्या निकृष्ट गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल आगाराची एसटी बस (फौजी अंबवडे ते मुंबई) आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास महाडच्या दिशेने येत होती. दरम्यान, कुरले गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरील साईडपट्टीवरून घसरून थेट बाजूला गेली.

थोडक्यात बचावले प्रवासी

अपघाताच्या वेळी बसमध्ये चालक-वाहकासह एकूण पाच प्रवासी महाडच्या दिशेने प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले.

मागील वर्षाच्या कटू आठवणी ताज्या

गेल्या वर्षीही (मे महिन्यात) पावसाळा सुरू होताच शिरगाव ते आंग्रे कोंड दरम्यान वाहने घसरून अपघातांची मोठी मालिका सुरू झाली होती. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले असले, तरी पहिल्याच पावसात रस्ता निसरडा झाल्याने वाहने घसरण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत.

रस्त्याच्या दर्जाबाबत प्रवाशांमध्ये तीव्र संताप

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीचे आणि गुणवत्तेचे दावे केले जात असले, तरी पहिल्याच पावसात उघड्या पडलेल्या या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘प्रशासनाने तात्काळ यावर उपाययोजना करावी, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही’, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!