• Thu. Jul 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पेण प्रशासनाचा मोठा निर्णय; धरण व धबधबे परिसरात ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेशबंदी!

ByEditor

Jul 16, 2026

विनायक पाटील
पेण :
हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी जारी केलेला रेड व ऑरेंज अलर्ट आणि पेण तालुक्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पेणचे उपविभागीय दंडाधिकारी प्रवीण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश ९ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संपूर्ण तालुक्यात लागू राहतील.

या आदेशानुसार पेण तालुक्यातील मोतीराम तलाव, शहापाडा धरण, हेटवणे धरण, आंबेघर धरण आणि कासमाळ येथील व्याघेश्वर धबधबा यांसह इतर सर्व धोकादायक नैसर्गिक पर्यटनस्थळांच्या एक किलोमीटर परिसरात पर्यटकांच्या प्रवेशावर आणि विविध कृत्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

बंदी घालण्यात आलेली धोकादायक ठिकाणे:

  • धरणे व तलाव: हेटवणे धरण, शहापाडा धरण, आंबेघर धरण, मोतीराम तलाव.
  • धबधबे व इतर: व्याघेश्वर धबधबा (कासमाळ) व इतर धोकादायक नैसर्गिक पर्यटनस्थळे.

का घेण्यात आला हा निर्णय?

मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येणे, सखल भागात पाणी साचणे, दरडी कोसळणे आणि पाण्याच्या प्रवाहात पर्यटक वाहून जाणे किंवा बुडणे अशा अनेक गंभीर घटनांची शक्यता असते. पेण पोलीस ठाण्याने सादर केलेल्या अहवालात पावसाळ्यात या धबधब्यांवर व धरणांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असल्याने गंभीर अपघातांचा धोका वर्तवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर हा खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय घेण्यात आला आहे.

‘या’ गोष्टींवर असणार सक्त मनाई:

मज्जाव केलेल्या पर्यटनस्थळांच्या १ किलोमीटरच्या परिसरात पुढील गोष्टींवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत:

  • पाण्यात उतरण्यास बंदी: वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरून पोहणे, धबधब्याच्या वरच्या भागात जाणे किंवा पाण्याच्या धोकादायक झोताखाली बसणे.
  • नशा व हुल्लडबाजी: मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत फिरणे आणि मोठ्या आवाजात डीजे, स्पीकर किंवा ऊफर वाजवणे.
  • फोटोग्राफी व रिल्स: सेल्फी काढणे, फोटोग्राफी, व्हिडिओ चित्रीकरण किंवा रिल्स तयार करणे.
  • पर्यावरण हानी: प्लास्टिक, काचेच्या बाटल्या व इतर कचरा उघड्यावर टाकणे.
  • वाहतुकीचे उल्लंघन: धोकादायक ठिकाणी वाहने उभी करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे. (शासकीय व आपत्कालीन वाहने वगळता इतर सर्व वाहनांच्या १ किमी परिसरात प्रवेशावर बंदी).
  • असामाजिक वर्तन: महिलांची छेडछाड करणे आणि प्रशासनाने लावलेले बॅरिकेड्स, दोर किंवा सुरक्षा फलक ओलांडून पुढे जाणे.

कारवाईचा इशारा:

“प्रशासनाने लागू केलेल्या या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल. पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वतःच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.”

प्रशासन, पेण तालुका

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!