श्रीवर्धन | अनिकेत मोहित
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, श्रीवर्धन येथील रवींद्र नारायण राऊत माध्यमिक विद्यालयाने ९२.९० टक्के निकालाची चमकदार नोंद केली आहे. विद्यालयाच्या या उज्ज्वल यशामुळे संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण १४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल १३१ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले असून विद्यालयाने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची गौरवशाली परंपरा यंदाही कायम राखली आहे. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी वैयक्तिक कामगिरीतही बाजी मारत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. यामध्ये अमृता अमोल कचरेकर हिने ९६.६० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. सुशांत सुभाष राजे याने ९४.०० टक्के गुणांसह द्वितीय, तर देवेंद्र मोहन वैद्य याने ९०.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय श्रेया रवींद्र चौलकर (९०.२० टक्के) आणि विशाखा राहुल धर्माधिकारी (८९.०० टक्के) यांनी अनुक्रमे पुढील क्रमांक पटकावत यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल भुसाणे, स्थानिक शाळा समितीचे सभापती जितेंद्र सातनाक तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप भगत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व सहकार्य करणाऱ्या पालकांचे विशेष अभिनंदन केले. विद्यालयाने प्रतिकूल परिस्थितीतही गुणवत्तेचा दर्जा टिकवून ठेवल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून, मान्यवरांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
