• Thu. Jul 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आंबेत-म्हाप्रळ पूल दुर्घटना: बार्ज मालकावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करा; अन्यथा २८ जुलैपासून आमरण उपोषण!

ByEditor

Jul 16, 2026

अझहर धनसे यांचा प्रशासनाला थेट इशारा; म्हसळा तहसीलदारांना निवेदन

अनिकेत मोहीत
श्रीवर्धन :
सावित्री नदीवरील महत्त्वाच्या आंबेत-म्हाप्रळ पुलाला बार्जने धडक देऊन झालेल्या गंभीर नुकसानीप्रकरणी संबंधित बार्ज मालकावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अझहर धनसे यांनी केली आहे. याप्रकरणी प्रशासनाला २८ जुलै २०२६ पर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला असून, या कालावधीत कारवाई न झाल्यास म्हसळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा धनसे यांनी दिला आहे.

यासंदर्भातील सविस्तर निवेदन गुरुवारी म्हसळा तहसीलदारांमार्फत रायगडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित विभागांना सादर करण्यात आले.

लिखित आश्वासनानंतर आजचे उपोषण तात्पुरते स्थगित

या पुलाच्या नुकसानीविरोधात आणि नागरिकांच्या प्रवासासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आज, १६ जुलै रोजी आमरण उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) बार्ज चालकावर व मालकावर गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे लेखी आश्वासन दिले. प्रशासनाला आवश्यक वेळ मिळावा या सकारात्मक भूमिकेतून हे उपोषण तूर्तास २८ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती अझहर धनसे यांनी दिली.

पोलिसांची फिर्याद घेण्यास टाळाटाळ?

मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाने बार्ज मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड पोलीस ठाण्यात आपले प्रतिनिधी पाठविले होते. मात्र, “पुलाच्या नुकसानीचे अधिकृत तांत्रिक मूल्यांकन अद्याप पूर्ण झाले नाही,” असे तांत्रिक कारण पुढे करत मंडणगड पोलिसांनी फिर्याद स्वीकारण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, आता रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील गोरेगाव पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी धनसे यांनी लावून धरली आहे.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:

फौजदारी गुन्हा: पुलाचे नुकसान करणाऱ्या संबंधित बार्ज मालकावर गोरेगाव पोलीस ठाण्यात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा.

बार्ज जप्ती: निष्काळजीपणे पूल उद्ध्वस्त करणारा संबंधित बार्ज त्वरित जप्त करण्यात यावा.

पर्यायी व्यवस्था व ऑडिट: पुलाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ अत्यंत तातडीने पूर्ण करून, वाहतूक ठप्प झाल्याने हाल सोसणाऱ्या नागरिकांसाठी ‘जंगल जेटी’ किंवा अन्य सुरक्षित पर्यायी वाहतूक व्यवस्था तात्काळ सुरू करावी.

प्रशासनाला इशारा

“येत्या २८ जुलै २०२६ पर्यंत प्रशासनाने बार्ज मालकावर ठोस कायदेशीर कारवाई केली नाही आणि पर्यायी व्यवस्था उभारली नाही, तर जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी म्हसळा तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण सुरू केले जाईल. या आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाल्यास, त्याला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील,” असा इशारा अझहर धनसे यांनी दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (महाड) तसेच गोरेगाव आणि मंडणगड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!