सामान्य जनतेशी संपर्क शून्य, पण बिरुद मात्र ‘जनसंपर्क अधिकारी’; कंपन्यांच्या ‘दलाल’ मानसिकतेचा पर्दाफाश
नागोठणे | मंगेश पत्की
कोणत्याही संस्थेचा चेहरा म्हणजे ‘जनसंपर्क अधिकारी’ (PRO). पण सध्या अनेक सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये हे पद म्हणजे केवळ ‘वेळकाढूपणा’ आणि ‘लोकांची दिशाभूल’ करण्याचे केंद्र बनले आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी, “साहेब मीटिंगमध्ये आहेत” किंवा “आम्ही बिझी आहोत” अशी रेकॉर्डेड उत्तरं देऊन सामान्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या ‘पांढरपेशा’ अधिकाऱ्यांचा खरा चेहरा आता समोर येऊ लागला आहे.
संवाद की शुद्ध लबाडी?
एकेकाळी अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्त्व या पदावर असायचे. मात्र, आता ज्यांचा पत्रकारितेशी किंवा सामाजिक जाणिवेशी दुरान्वयेही संबंध नाही, अशांची वर्णी या पदावर लागली आहे. एखादी समस्या घेऊन सामान्य माणूस किंवा पत्रकार गेला, की हे महाशय चक्क ‘कलेक्टर ऑफिस’ किंवा ‘मंत्रालया’त असल्याच्या थापा मारतात. प्रत्यक्षात मात्र हे अधिकारी एसी केबिनमध्ये बसून केवळ सोयीचे राजकारण करण्यात मग्न असतात. जनतेशी नाळ तुटलेले हे ‘हाय प्रोफाईल’ अधिकारी स्वतःला सामान्यांपेक्षा श्रेष्ठ समजण्याच्या अविर्भावात वावरत आहेत.
’पोपटपंची’ आणि पोलिसांचा आधार
जेव्हा एखाद्या कंपनीचे पाप उघडकीस येते किंवा जनतेचा रोष वाढतो, तेव्हा हे जनसंपर्क अधिकारी सर्वात आधी पळ काढतात. जनतेसमोर येऊन वस्तुस्थिती मांडण्याऐवजी, हे अधिकारी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवून तक्रारदारांवरच दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. “बोलका पोपट” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अधिकाऱ्यांकडे केवळ व्यवस्थापनाची तळी उचलण्याचे काम उरले आहे. पत्रकारांना माहिती देण्याऐवजी, त्यांनाच ‘पत्रकारिता कशी करावी’ हे शिकवण्याचा निर्लज्जपणाही अनेकदा पाहायला मिळतो.
प्रशासनाची आणि जनतेची थट्टा
जनतेच्या प्रश्नांसाठी फिल्डवर जाण्याऐवजी केबिनमध्ये बसून ‘मीटिंग’चे सोंग आणण्याचे, मोजक्या दोन-चार जवळच्या लोकांशी संबंध ठेवून सर्व काही ‘आलबेल’ असल्याचे भासवायचे, संस्थेच्या धोरणांची साधी माहिती नसतानाही केवळ पगारासाठी खुर्च्या उबवायच्या आणि सामान्य माणसाला तुच्छ लेखून स्वतःला ‘व्हीआयपी’ समजण्याची खोड ह्या अधिकाऱ्यांची आहे.
जनसंपर्क म्हणजे केवळ जाहिराती देणे किंवा पार्ट्या झोडणे नव्हे, तर तो जनतेचा विश्वास संपादन करण्याचा मार्ग आहे. जर हे अधिकारी संवादाचा पूल बनण्याऐवजी अडथळा बनत असतील, तर व्यवस्थापनाने अशा ‘शोभेच्या बाहुल्यांना’ घरी बसवण्याची वेळ आली आहे. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे टाळणाऱ्या या अधिकाऱ्यांचा बुरखा फाडणे आता काळाची गरज बनली आहे.
| थापा मारण्यात पीएचडी! “साहेबांची मीटिंग सुरू आहे”, “आम्ही दौऱ्यावर आहोत”, “फाईल प्रोसेसमध्ये आहे”… या आणि अशा अनेक ठराविक थापा मारण्यात हे अधिकारी तरबेज झाले आहेत. फोन उचलण्याची तसदी न घेणारे आणि समोर आल्यावर तोंड लपवणारे हे अधिकारी ‘जनसंपर्क’ या शब्दाचाच अपमान करत आहेत. |
