• Sun. Mar 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड पोलिसांची मोठी कारवाई; १.०९ कोटींचा गोवा बनावटीचा दारूसाठा टँकरसह जप्त

ByEditor

Mar 22, 2026

​कर्जत : गणेश पवार
कर्जत-नेरळ परिसरात गोवा बनावटीच्या अवैध दारूची तस्करी करणाऱ्या एका टँकरवर रायगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ कोटी ९ लाख २७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. लादूराम सियाराम बिश्नोई (वय ४२, रा. बारमेर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, २१ मार्च २०२६ रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास कर्जत-मुरबाड रोडवरील वारे गावच्या हद्दीत ‘कोकण किनारा’ हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा रचला होता. संशयास्पद वाटणारा टँकर (क्रमांक GJ-12 AW-4421) अडवून त्याची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचे बॉक्स लपवून ठेवल्याचे उघड झाले. यामध्ये ‘एव्हरग्रीन रिझर्व्ह व्हिस्की’चे ४३० बॉक्स, ‘मोबी व्होडका ऑरेंज’चे १७९ बॉक्स आणि ‘मोबी व्होडका ग्रीन ॲपल’चे १९० बॉक्स असे एकूण ७९९ बॉक्स (९,५८८ बाटल्या) आढळून आले. जप्त केलेल्या दारूची किंमत सुमारे ८० लाख २७ हजार ६०० रुपये असून, २९ लाखांचा टँकर असा एकूण १.०९ कोटींचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

​सदरची यशस्वी कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिनीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस पथकाने केली आहे. या तस्करीमागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!