• Sun. Mar 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ओबीसी आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार; खारघरमध्ये राज्यव्यापी मेळावा संपन्न

ByEditor

Mar 22, 2026

३३ जातींचा केंद्रीय सूचीत समावेश करण्यासाठी ‘महाराष्ट्र ओबीसी कृती समिती’ आक्रमक

उरण : विठ्ठल ममताबादे
महाराष्ट्र राज्यातील ३३ ओबीसी जाती समूहांचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश करावा आणि आरक्षणाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारिणी बैठक व पदभार सोहळा खारघर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. “आरक्षण हा आमचा घटनादत्त हक्क असून तो मिळवण्यासाठी दिल्लीपर्यंत लढा अधिक तीव्र करू,” असा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.

oppo_0

पनवेलजवळील खारघर येथील लेवे गुजर भवन येथे हा राज्यव्यापी मेळावा पार पडला. लेवे गुजर समाज आणि कराडी समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे यजमानपद भूषवण्यात आले. यावेळी राज्यातील ३३ विविध ओबीसी समाज संघटनांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरक्षणाचा प्रश्न ९९ टक्के मार्गी: राम खरपुरिया

समितीचे कार्याध्यक्ष राम खरपुरिया यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “सततच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने आपल्या लढ्याची दखल घेतली असून आरक्षणाचे काम ९९ टक्के मार्गी लागले आहे. उर्वरित १ टक्क्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, न्याय न मिळाल्यास दिल्लीत मोठे आंदोलन छेडले जाईल.”

हक्कासाठी एकजूट आवश्यक: श्रावण फरकाडे

अध्यक्ष श्रावण फरकाडे यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले की, राज्यात आरक्षण असूनही केंद्रात समावेश नसल्याने ओबीसी समाजातील अनेक पोटजातींचे मोठे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी १०० हून अधिक खासदारांची भेट घेऊन संसदेत आवाज उठवण्यात आला आहे. आता समाजाने ‘लाकडाच्या मोळी’प्रमाणे एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

oppo_0

नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा

यावेळी कार्यकारिणीचा पदभार सोहळाही पार पडला. अनेक मान्यवरांना प्रमाणपत्रे देऊन त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली. बैठकीच्या दुपारच्या सत्रात आरक्षणासंदर्भातील विविध ठराव मांडण्यात आले, ज्याला उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने हात उंचावून पाठिंबा दिला.

या सोहळ्याला संरक्षक मंडळाचे डॉ. नामदेवराव राऊत, प्रकाश सिद्ध, पी.आर. बडगुजर, शालिकजी नेवारे, माजी जि.प. अध्यक्षा सरिता गाकरे, मोरेश्वर भादे, दीपक नेवे, मुकुंद मुसळे, महादेव बंडा यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मधुकर सुरते यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!