• Mon. Mar 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिवेआगरच्या समुद्रात पुण्याच्या पर्यटकाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला जीवघेणा

ByEditor

Mar 23, 2026

श्रीवर्धन | अनिकेत मोहित
कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील एका २१ वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सिद्धार्थ रमेश धिंगले (रा. शिवदर्शन चाळ, पुणे) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे दिवेआगर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हा आपल्या काही मित्रांसोबत दिवेआगर येथे पर्यटनासाठी आला होता. रविवारी दुपारच्या सुमारास सर्व मित्र समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र, पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि अचानक आलेल्या मोठ्या लाटेच्या तडाख्याने सिद्धार्थ खोल पाण्यात ओढला गेला. काही क्षणातच तो मित्रांच्या डोळ्यादेखत लाटांसोबत वाहून गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

​सिद्धार्थ बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून दिघी सागरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छिमार आणि नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात आली.

​भरडखोल परिसरात आढळला मृतदेह

​बऱ्याच वेळ शोध घेतल्यानंतर सिद्धार्थ हा भरडखोल परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला तत्काळ बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला ‘मृत’ घोषित केले.

“पर्यटकांनी समुद्राच्या लाटांचा आणि खोलीचा अंदाज घेतल्याशिवाय पाण्यात उतरू नये. विशेषतः भरती-ओहोटीच्या वेळी किनाऱ्यावर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील.”

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!