पर्यावरणपूरक प्रकल्पाला प्रशासकीय निष्काळजीपणाचा फटका
काम अपूर्ण असतानाच ठेकेदाराला बील अदा; उच्चस्तरीय चौकशीसह गुन्ह्याची मागणी
माणगाव । सलीम शेख
पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार आणि प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट ठेवून माणगाव नगरपंचायतीने उभारलेली कोट्यवधी रुपयांची विद्युतदाहिनी गेल्या तब्बल पाच वर्षांपासून धूळ खात पडली आहे. प्रशासकीय दुर्लक्ष, नियोजनशून्यता आणि ठेकेदाराच्या मनमानीमुळे शासनाच्या कोट्यवधींच्या निधीची उघडउघड राखरांगोळी झाली असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी माणगाव तालुक्यातून होत आहे.
उद्देश चांगला, नियोजन शून्य!
वृक्षतोड रोखणे, अंत्यसंस्कार प्रक्रिया सुलभ करणे आणि प्रदूषणमुक्त वातावरण ठेवणे या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या योजनेंतर्गत ही अत्याधुनिक विद्युतदाहिनी उभारण्यात आली. मात्र, उद्घाटनाच्या प्रतीक्षेतच हा प्रकल्प वर्षानुवर्षे रखडला आणि अखेर धूळ, गंज आणि निष्क्रियतेच्या विळख्यात अडकला. लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. आता ही महागडी यंत्रसामग्री निकामी होण्याच्या मार्गावर असल्याने ती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी अतिरिक्त निधीचा भूर्दंड सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
काम अपूर्ण, तरीही बील अदा!
या प्रकरणात नगरपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित ठेकेदार बाहेरील जिल्ह्यातील असून, काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याला बहुतांश बिलाची रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पैसे पदरात पडल्यामुळे ठेकेदार उर्वरित काम पूर्ण करण्यास सातत्याने टाळाटाळ करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे मंजुरीपासून ते देयक अदा करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
प्रशासनाची भूमिका
“संबंधित ठेकेदाराला अनेक वेळा दूरध्वनीद्वारे तसेच लेखी पत्रव्यवहार करून काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याने अद्यापही काम पूर्ण केलेले नाही.”
— संतोष माळी, मुख्याधिकारी, माणगाव नगरपंचायत
ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
शासकीय निधीचा अपव्यय करणाऱ्या आणि नागरिकांना सुविधेपासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित ठेकेदाराविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करावा, त्याच्याकडून झालेल्या आर्थिक नुकसानीची वसुली करावी आणि निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.
विद्युतदाहिनी सुरू होणार कधी?
गेल्या पाच वर्षांपासून ही सुविधा बंद असल्याने नागरिकांना आजही नाईलाजाने लाकडाचा वापर करून पारंपरिक पद्धतीनेच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे तीनतेरा वाजवणारे जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारावर नगरपंचायत प्रशासन व शासन नेमकी कधी कारवाई करणार, आणि ही विद्युतदाहिनी प्रत्यक्षात कधी कार्यान्वित होणार, याकडे संपूर्ण माणगावकरांचे लक्ष लागले आहे.
