शासकीय बंदी कालावधीमुळे खोल समुद्रातील व्यवसाय ठप्प
बाजारात सुरमई, पापलेटऐवजी बोंबील आणि जवळ्याचीच आवक
श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन समुद्रकिनारी अद्याप नियमित मासेमारीला परवानगी मिळालेली नसल्याने स्थानिक मच्छीमार आणि मासेप्रेमी खवय्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. शासनाचा अधिकृत मासेमारी बंदी कालावधी लागू असल्याने सध्या समुद्रातील नियमित मासेमारी पूर्णपणे बंद आहे.
खाडीतील मासेमारीवरच मदार
श्रीवर्धन परिसरात १२ नॉटिकल मैलांपेक्षा दूर खोल समुद्रात जाऊन मासेमारी करू शकतील अशा मोठ्या नौकांची (होड्यांची) संख्या मर्यादित आहे. त्यामुळे बहुतांश मच्छीमारांना सध्या खाडी परिसरातच मर्यादित स्वरूपात मासेमारी करावी लागत आहे. परिणामी, स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणावर मासळी उपलब्ध होत नसून केवळ ओले बोंबील, जवळा आणि इतर लहान प्रकारचीच मासळी काही प्रमाणात पाहायला मिळत आहे.
सुरमई, पापलेट गायब; खवय्यांमध्ये नाराजी
स्थानिक बाजारपेठेत नेहमी दिसणारे मोठे आणि विविध प्रकारचे समुद्री मासे सध्या उपलब्ध नसल्याने मासे खवय्यांमध्ये उघड-उघड नाराजीचे वातावरण आहे. समुद्रातील नियमित मासेमारी पूर्ववत सुरू झाल्यानंतरच बाजारात सुरमई, बांगडा, पापलेट आणि कोळंबी यांसारख्या लोकप्रिय माशांची आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
हवामान आणि बंदी उठण्याची प्रतीक्षा
शासकीय बंदी कालावधी संपुष्टात आल्यानंतर आणि समुद्रातील हवामान अनुकूल झाल्यानंतरच मासेमारीला खऱ्या अर्थाने गती मिळेल, असा विश्वास स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. तोपर्यंत श्रीवर्धनकरांना खाडीतील मर्यादित मासळीच्या उपलब्धतेवरच समाधान मानावे लागणार आहे.
