◼️ “आधी महामार्ग पूर्ण करा, मगच टोल घ्या!” — जनआक्रोश समितीचा एल्गार
◼️ सुकेळी खिंड आणि पनवेल टोलवसुलीवर संताप; उच्च न्यायालयात PIL अंतिम टप्प्यात
◼️ मनसे प्रमुख राज ठाकरे ९ ऑगस्टला रायगड दौऱ्यावर; महामार्गाचा प्रश्न मांडणार
माणगाव । सलीम शेख
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना आज पुन्हा एकदा नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. अपूर्ण पूल, अर्धवट सेवा रस्ते, धोकादायक डायव्हर्शन, खड्डे आणि वाहतूक कोंडी यांमुळे कोकणवासीयांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. रस्ता अपूर्ण आणि प्रवास असुरक्षित असतानाही दुसरीकडे प्रशासनाकडून पूर्ण टोलवसुली सुरू असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
जनआक्रोश समितीचा न्यायालयीन लढा
अपूर्ण महामार्गावरील टोलवसुली आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आता जनआक्रोश समितीने न्यायालयीन मार्ग स्वीकारला आहे. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
सुकेळी खिंड आणि पनवेल येथे सुरू असलेली टोलवसुली तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी समितीने केली आहे. “काम अपूर्ण असताना टोलवसुली करणे बेकायदेशीर आहे. आधी रस्ता पूर्ण आणि सुरक्षित करा, मगच टोल घ्या,” अशी ठाम भूमिका जनआक्रोश समितीने घेतली आहे.
लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह
खासदार सुनील तटकरे यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन महामार्गाच्या दुरवस्थेबाबत निवेदन दिले होते. मात्र, केवळ निवेदने देऊन हा प्रश्न सुटणार नसून, प्रत्यक्ष कामाला गती कधी मिळणार आणि टोलवसुलीबाबत ठोस निर्णय कधी होणार? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
राज ठाकरेंच्या दौऱ्याकडे लक्ष
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ९ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचा रखडलेला प्रश्न आणि ‘टोलच्या झोल’बाबतची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे.
“जीव महत्त्वाचा, टोलचे पैसे नव्हे!”
दररोज हजारो कुटुंबे या महामार्गावरून प्रवास करतात. एखादी छोटीशी चूक किंवा रस्त्यावरील खड्डा संपूर्ण कुटुंबाचा घात करू शकतो. अशा स्थितीत “आम्ही नियमित टोल भरतो, मग आम्हाला सुरक्षित रस्ता का मिळत नाही?” असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. महामार्ग पूर्ण होईपर्यंत आणि सुरक्षेची खात्री मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा जनआक्रोश समितीने दिला आहे.
