• Fri. Aug 7th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

संवेदनशील किनारपट्टीवर सागरी सुरक्षेचे अभेद्य कवच!

ByEditor

Aug 7, 2026

शेखाडी, कुरवडे व बागमांडला येथे पोलिसांसाठी आधुनिक ‘पोटा केबिन’ कार्यान्वित; २४ तास कडक पहारा

श्रीवर्धन पोलिसांची किनारपट्टीवर विशेष गस्त व नजर

श्रीवर्धन । अनिकेत मोहीत
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सागरी किनारपट्टीवर सुरक्षेचा घेरा अधिक मजबूत करण्यात आला आहे. निश्चित करण्यात आलेल्या प्रमुख ‘लँडिंग पॉइंट्स’वर पोलिसांसाठी आधुनिक ‘पोटा केबिन’ उभारण्यात आल्या असून, शेखाडी, कुरवडे आणि बागमांडला या महत्त्वाच्या ठिकाणी आता २४ तास कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज केबिन

सागरी सीमेवरून होणाऱ्या संभाव्य घुसखोरीला आणि बेकायदेशीर हालचालींना अटकाव घालण्यासाठी या पोटा केबिन अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. यामध्ये २४ तास तैनात असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी खुर्ची, पंखा आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे दिवस-रात्र गस्त घालणे, समुद्रावर सतत बारीक लक्ष ठेवणे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे पोलिसांना अधिक सोयीचे झाले आहे.

रायगडच्या पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या पुढाकाराने आणि श्रीवर्धन पोलिस ठाण्याच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवण्यात आली आहे. या उपक्रमातून सागरी सुरक्षेबाबत रायगड पोलिस प्रशासनाची तत्परता आणि गांभीर्य स्पष्टपणे दिसून येत आहे.

बागमांडला येथील केबिनची तातडीने दुरुस्ती

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बागमांडला येथील पोटा केबिनच्या एका बाजूचा खालील भाग (जोथा) समुद्राच्या भरतीच्या जोरदार लाटांमुळे काही प्रमाणात ढासळला होता. या घटनेमुळे केबिन वाहून जाण्याचा धोका नसला, तरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून तात्काळ दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीवर्धनचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिली.

पोलिस प्रशासनाच्या या महत्त्वपूर्ण पावलाचे स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. “समुद्र किनाऱ्यावर पोलिसांची २४ तास उपस्थिती आणि सततची गस्त यामुळे आम्हाला आता अधिक सुरक्षित वाटत आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या या पोटा केबिन श्रीवर्धन किनारपट्टीसाठी एक भक्कम सुरक्षा कवच ठरत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!