उरण | अनंत नारंगीकर
रुग्ण बरे होण्यासाठी रुग्णालयात जातात, मात्र उरण तालुक्यातील विंधणे येथील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी जाणारे नागरिक इमारतीच्या दुरवस्थेमुळे जखमी होऊन परत येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या या उपकेंद्राच्या इमारतीचा स्लॅब वारंवार ढासळत असल्याने रुग्णांच्या व कर्मचाऱ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन या इमारतीचे नव्याने बांधकाम करावे, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
निकृष्ट कामे आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे अपघातांचे सत्र
उरण तालुक्यात सध्या अनेक शासकीय व विकास कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यातील आर्थिक हितसंबंधांमुळे कामांचा दर्जा घसरत असून, त्याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
रुग्णांचे नातेवाईक चिंतेत
सध्या उरण तालुक्यातील अनेक शासकीय व खाजगी रुग्णालये विविध समस्यांच्या विळख्यात सापडली आहेत. विंधणे उपकेंद्राच्या इमारतीची दुरुस्ती करूनही स्लॅब कोसळण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. यामुळे उपचारासाठी दाखल झालेला रुग्ण सुखरूप घरी परत येईल का, अशी भीती रुग्णांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे.
”विंधणे येथील उपकेंद्र इमारतीच्या दुरुस्तीचे काम केले जाते, मात्र जवळून जाणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे इमारतीला हादरे बसतात. त्यामुळे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर येथे नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आला आहे.”
— डॉ. वंदन कुमार पाटील (तालुका वैद्यकीय अधिकारी, उरण)
