• Sat. Aug 8th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

​‘पक्ष-चिन्ह चोरले; आता रामाच्या देणग्यांवर डल्ला?’

ByEditor

Aug 8, 2026

उरणमध्ये आमदार भास्कर जाधवांचा भाजपवर हल्लाबोल‘; श्रीरामच भाजपचा अहंकार संपवतील’

​उरण | घनश्याम कडू
शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह पळवून सत्ता मिळविणाऱ्या भाजपला आता राम मंदिराच्या देणग्यांवरूनही जनतेच्या सवालांना सामोरे जावे लागत आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभेतील गटनेते आमदार भास्कर जाधव यांनी केला. १४०० कोटी रुपयांच्या सोने-चांदीच्या देणग्यांबाबत होणाऱ्या आरोपांमुळे भाजपच्या अहंकारी सत्तेचा अंत स्वतः प्रभू श्रीरामच करतील, असा घणाघातही त्यांनी या वेळी केला.

​उरण शहर शिवसेनेच्या वतीने राम मंदिर सभागृहात आयोजित सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

​केंद्र सरकार व स्थानिक नेतृत्वावर ताशेरे

​आपल्या भाषणात आमदार जाधव यांनी भाजपसह केंद्र सरकार आणि स्थानिक आमदार महेश बालदी यांच्यावर सडकून टीका केली. न्यायहक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार व अश्रूधुराचा वापर करून तरुणाईचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशभरात भाजपविरोधात असंतोषाचा वणवा पेटल्याचेही ते म्हणाले.

​उरणमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, “महाविकास आघाडीने भाजपच्या तथाकथित बालेकिल्ल्यात सुरुंग लावत नगराध्यक्षांसह शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणून त्यांना आरसा दाखवला आहे.” या वेळी त्यांनी शिवसैनिकांना खुर्च्या सोडून मैदानात उतरण्याचे आणि संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले.

पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांची खरमरीत टीका

​मनोहर भोईर (माजी आमदार व जिल्हाप्रमुख): उरण नगरपरिषद निवडणुकीत २१-० असा विजय मिळवण्याची घोषणा करणाऱ्या भाजपचे मतदारांनी चांगलेच गर्वहरण केले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

​नरेश रहाळकर (उपजिल्हाप्रमुख): भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजपला आता स्वतःचीच भीती वाटू लागली असून शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, अशी टीका त्यांनी केली.

​संतोष ठाकूर (तालुकाप्रमुख): १२ वर्षांपासून राजीव गांधी सभागृहाचे काम आणि बायपास रस्ता अपूर्ण असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी स्थानिक आमदारांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

​नवनिर्वाचित प्रतिनिधींचा सत्कार

​या कार्यक्रमात गणेश शिंदे यांनी प्रास्ताविक करताना गेल्या ४० वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमात उरण नगरपरिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला, तसेच नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

​विधानसभेतील वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव उरणमध्ये काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जाधव यांच्या आक्रमक भाषणामुळे उरणमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!