शासनाची भरपाई कागदावरच; सर्वे, बैठक आणि आश्वासनांच्या फेऱ्यात अडकला बागायतदार
माणगाव । सलीम शेख
कोकणाला लाभलेले निसर्गाचे वरदान म्हणून ओळखला जाणारा ‘फळांचा राजा’ हापूस आंबा यंदा अभूतपूर्व संकटात सापडला आहे. देश-विदेशात मोठी मागणी असलेल्या या आंब्याच्या हंगामाकडे दरवर्षी उत्सुकतेने पाहिले जाते; मात्र यंदा बदलत्या हवामानामुळे आंबा व काजू या दोन्ही नगदी पिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. उत्पादनात तब्बल ९० टक्क्या पर्यंत घट झाल्याचे चित्र असून, उर्वरित पिकावरही रोग व अवकाळी पावसाचे सावट कायम उभे ठाकले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील बागायतदार शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.
हापूसच्या पहिल्या पेटीसाठी मुंबई–पुणे बाजारपेठेत श्रीमंत ग्राहकांची लिलावात चढाओढ असते; परंतु यंदा “पहिला आंबा कोण खाणार?” हा प्रश्नच अनुत्तरित राहण्याची वेळ आली आहे. हवामानाचा घातक खेळ निसर्गाने मांडला असून याबद्दल त्या हवामानाने मोहरावरच घाव घालून बागायतदारांचे प्रचंड नुकसान केले आहे. यंदाच्या हंगामात हवामानाने अक्षरशः लपंडाव खेळला आहे. पाऊस उशिरा थांबला तसेच थंडी उशिरा सुरू झाली मध्येच तापमानात अचानक वाढ या चढउतारा मुळे डिसेंबरमध्ये यायला हवा असलेला आंब्याचा मोहोर उशिरा आला. जानेवारीत थंडीचा परिणाम दिसला; मात्र त्यानंतर अचानक तापमान वाढल्याने मोहर गळून पडला. परिणामी उत्पादनावर मोठा परिणाम झाला. रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा, मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, कोल्हापूर व अलिबाग येथे बहुतांश भागात सुरुवातीला मोहोर दिसत असला तरी प्रत्यक्षात फळ धारणा अत्यल्प राहिली. सध्या अनेक ठिकाणी केवळ ५ टक्केच आंबा शिल्लक आहे. त्यातच अवकाळीचा फटका बसत आहे.
या फळावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्यावर औषध फवारणीवर खर्च वाढला आणि उत्पादन शून्य अशी स्थिती झाली. हवामानातील बदलामुळे तुडतुडे व भुरीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला. शेतकऱ्यांनी फवारणीसाठी मोठा खर्च केला एका फवारणीसाठी तब्बल ४५ हजार रुपये माणगाव तालुक्यातील मोर्बा येथील बागायतदार शेतकरी अबूबकर गंगरेकर यांना आला खर्च आला. त्यांनी आपल्या आंबा फळ पिकावर तीन ते चार वेळा औषध फवारणी केली. तरीही उत्पादनावर काहीच परिणाम झाला नाही. “फवारणी केली, एवढंच समाधान; पण हातात काहीच आलं नाही,” अशी शेतकऱ्यांची हतबल प्रतिक्रिया आहे. अबूबकर गंगरेकर यांची कहाणी : कष्टाचे पीक एका झटक्यात निसर्गाने उद्ध्वस्त करून टाकले. मोर्बा येथील ६५ वर्षीय बागायतदार अबूबकर उस्मान गंगरेकर यांनी १९९४ पासून कष्टाने उभी केलेली आंबा-काजू बाग यंदा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. ५ एकर आंबा सुमारे ३०० हापूस झाडे ३३ वर्षांची, तर ५ एकर काजू वेंगुर्ला वाण ६०० फळझाडे उभे आहेत. त्यांना या फळ पिकातून दरवर्षी हापुस आंबा ५ लाख रुपये, काजू ४ ते ४.५ लाख रुपये उत्पन्न मिळते. यंदा मात्र संपूर्ण पीक हातातून गेले.
“निसर्गाचा कोप झाला की औषध, फवारणी काहीच काम करत नाही. आता खायचं काय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ११ हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात; अर्थकारण ढासळले रायगड जिल्ह्यात सुमारे १२००० चे वर हेक्टरवर आंबा लागवड असून १२००० हजार हेक्टर उत्पादन क्षम क्षेत्र आहे. या संपूर्ण क्षेत्रावर हवामान बदलाचा गंभीर परिणाम झाला आहे. आंबा आणि काजू ही कोकणातील प्रमुख नगदी पिके असल्याने हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आले असून निर्यात घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संकटामुळे स्थानिक अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
शासनाने अद्याप ही बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आपली भूमिका स्पष्ट केली नाही. आश्वासनांचा पाऊस, प्रत्यक्षात दुष्काळ आंबा, काजू नुकसान भरपाईसाठी विधानसभेत आवाज उठला. प्रति शेतकरी सरसकट ५ लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम देण्याची मागणी झाली. त्यानंतर या प्रश्नाला उत्तर देताना फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना भरपाई कशी देता येईल याबाबत उत्तर देऊन आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाचे प्रत्यक्षात काय झाले ? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच राहिला. आंबा नुकसानीचा विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञा मार्फत सर्वे सरासरी करण्यात आला. त्यानुसार शासनाला अहवाल तयार करून पाठविण्यात आल्याचे समजते दरम्यान ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी किती काळ लोटणार हा प्रश्नच आहे. मात्र ही भरपाई मिळेपर्यंत शेतकरी मात्र आर्थिकदृष्ट्या कोलमडत आहे.
कोकणातील शेतकऱ्यांचा अनुभव कटू आहे. प्रत्येक वेळी आश्वासन दिले जाते. सर्वे होतात, फाईली फिरतात आणि शेवटी शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही. यंदाही तसंच होणार का ? ‘धोरण’ की ‘ढिलाई’? हा मोठा प्रश्न बागायतदारांसमोर उभा आहे. सध्याची शासनाची भूमिका पाहता कांही गंभीर प्रश्न नुकसानग्रस्त बागायतदार आतून बोलताना उपस्थित होत असुन शासनाने यापुढे हवामान बदलाचे पूर्वनियोजन करणेअपेक्षित आहे. तसेच नुकसानीची तात्काळ मदत देण्याऐवजी सर्वेची साखळी कशासाठी ? तसेच नगदी पिकांसाठी स्वतंत्र आपत्कालीन निधी का नाही ? या सर्व प्रश्नांची उत्तरे बागायतदार विचारत असून शेतकरी वर्षभर निसर्गावर अवलंबून राहतो; पण संकटात शासनाचा आधार वेळेवर मिळत नसेल, तर ही केवळ धोरणात्मक अपयशाची कबुली आहे अशी चर्चा होत आहे. हापूस आंबा हा केवळ फळ नाही, तर कोकणची ओळख आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तोच आज संकटात आहे. शासनाने तात्काळ आणि ठोस निर्णय घेतला नाही, तर शेतकरी उद्ध्वस्त होईल.
“यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण कोकणा सह रायगड जिल्ह्यातील आंबा फळपीक उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे, याची शासनाला पूर्ण जाणीव आहे. नुकसानग्रस्त बागायतदारांचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या असून, नुकसानीचा अहवाल आल्यानंतर त्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य ती नुकसान भरपाई निश्चित केली जाईल. शासन या विषयात अत्यंत सकारात्मक असून, आंबा उत्पादकांना निश्चितपणे न्याय मिळेल.”
-भरतशेठ गोगावले, फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र
रायगड जिल्ह्यात १२ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा फळ बागायती क्षेत्र आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे या फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रायगड जिल्ह्यात ९० टक्के आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. याबाबत जिल्ह्यात विद्यापीठाच्या तज्ञ शास्त्रज्ञा कडून नुकसानीचा सर्वे करण्यात आला. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला असून. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत अद्याप शासन स्तरावरून नुकसान भरपाईचे आदेश आलेले नाहीत. शासनाकडून जे आदेश येतील त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल.
वंदना शिंदे,
जिल्हा कृषी अधिकारी, रायगड
