रोहा (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेची रोहा तालुका कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त करण्यात आली आहे. याचसोबत, माजी तालुका प्रमुख आणि माजी उपजिल्हाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहा नगरपालिका निवडणुकीत मनोजकुमार शिंदे यांनी पक्षाच्या धोरणांविरुद्ध जाऊन विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा संशय होता. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश मिळाले असले, तरी मागील नगरपालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नव्हते. या अपयशासाठी आणि पक्षविरोधी वर्तणुकीसाठी शिंदे यांच्यावर पक्षाची नाराजी होती.
जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक
शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली आज रोहा येथे पक्षाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर मनोजकुमार शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कार्यकारिणी बरखास्त
केवळ शिंदे यांची हकालपट्टी करून न थांबता, रोहा तालुक्याची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय बैठकीत जाहीर करण्यात आला. लवकरच या ठिकाणी नवीन आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी उभारली जाईल, असे संकेत जिल्हाप्रमुखांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच मनोजकुमार शिंदे यांनी आपल्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता, मात्र आता त्यांच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“पक्षामध्ये शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांनी पक्षविरोधी काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई करणे संघटनेच्या हिताचे आहे. लवकरच रोहा तालुक्यात नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल.”
— राजा केणी (जिल्हाप्रमुख, शिवसेना, रायगड)
