नगराध्यक्षांच्या तक्रार अर्जाला केराची टोपली; अवजड वाहतुकीचा प्रश्न अधांतरी ठेवून कंपनीचा ‘सामाजिक’ खेळ
धाटाव । शशिकांत मोरे
रोहा रेल्वे स्टेशन यार्डातून विळे येथील ‘पोस्को’ कंपनीसाठी होणारी अवजड लोखंडी कॉईल्सची वाहतूक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वाहतुकीमुळे रोहे-अष्टमीकरांच्या जिवावर टांगती तलवार असतानाच, कंपनीने दुसरीकडे वरसे ग्रामपंचायतीला ‘ओपन जिम’ उपलब्ध करून दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कंपनीच्या या विचित्र कारभारामुळे “अष्टमीकर सुपात तर वरसे-भुवनेश्वरवासीय तुपात” अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, यामागे नेमके काय ‘गौडबंगाल’ आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जीवघेणा प्रवास आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
गेल्या वर्षभरापासून मातेश्वरी ट्रान्सपोर्टच्या ट्रेलरमधून २४ टन वजनाच्या धोकादायक लोखंडी कॉईल्सची वाहतूक रोहिदासनगर आणि अष्टमी भागातून सुरू आहे. येथील रस्ते अरुंद असून पिंगळसई पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी वर्दळ असते. या अवजड वाहतुकीमुळे अपघात वाढले असून कुंडलिका नदीवरील जुना अष्टमी पूलही हादरे खात आहे. काही महिन्यांपूर्वी एक ट्रेलर उलटल्याची घटनाही घडली होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर रोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे आणि मुख्याधिकाऱ्यांनी पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन ही वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
विशेष म्हणजे, एकीकडे रोहा नगरपरिषद आणि स्थानिक नागरिक या वाहतुकीचा विरोध करत असताना, पोस्को कंपनीने आपला सामाजिक दायित्व निधी (CSR) वरसे ग्रामपंचायत हद्दीतील एकता नगर येथे खर्च केला आहे. तेथे नागरिकांसाठी ‘ओपन जिम’ उभारण्यात आली आहे. ज्या भागाला वाहतुकीचा सर्वाधिक त्रास होतोय, त्यांना डावलून शेजारील गावाला सुविधा पुरवल्या जात असल्याने अष्टमीकरांमध्ये संतापाची लाट आहे.
स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष
धामणसई, सोनगाव, मालसई आणि मुठवली या ग्रामीण भागातील नागरिकांनी या कंपन्यांकडे रुंद आणि सुरक्षित रस्त्यांची मागणी केली आहे. “रस्ते सुधारा, मगच वाहतूक करा” ही भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करून कंपनी व्यवस्थापन केवळ सोयीस्कर राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे.

“जे.एस.डब्ल्यू. यार्डातून होणारी ही २४ टनी कॉईल्सची वाहतूक अत्यंत जीवघेणी आहे. अरुंद रस्त्यावरून ट्रेलर जात असताना नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. रात्रीची वाहतूक तर अधिकच धोकादायक आहे. प्रशासनाने यावर तातडीने निर्बंध घालावेत.”
-महेंद्र मोरे (सामाजिक कार्यकर्ते, रोहा)
