तिसरी मुंबई आणि भूसंपादनाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; सरकारचा तीव्र निषेध
उरण । विठ्ठल ममताबादे
एमएमआरडीएने तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली उरण तालुक्यातील कोप्रोली गावच्या वेशीवर केलेले काळे-पिवळे मार्किंग गुरुवारी ग्रामस्थांनी अक्षरशः जाळून खाक केले. “जमीन, घर आणि गाव वाचवा, एमएमआरडीए हटवा” अशा घोषणा देत सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एमएमआरडीए व राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी मार्किंगवर टायर जाळून सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला.
शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे धोरण
एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीचे सरचिटणीस रुपेश पाटील यांनी यावेळी उपस्थितांना भूसंपादनाच्या शासन निर्णयातील धोके समजावून सांगितले. ते म्हणाले की, “सरकारचे धोरण फसवे आणि शेतकरी विरोधी आहे. जर आपण आज संघटित झालो नाही, तर भविष्यात आपली गावठाणाबाहेरील घरेही बेकायदेशीर ठरवली जातील. सरकारने मूळ गावठाणाबाहेरील घरांना तातडीने सनद (प्रॉपर्टी कार्ड) देऊन सुरक्षित करावे आणि ५०० मीटरपर्यंत गावठाण विस्तार जाहीर करावा.”
बेकायदेशीर सर्वेक्षणाला चहुबाजूंनी विरोध
एमएमआरडीएने गावोगावी अशा प्रकारे हद्दी निश्चित करून बेकायदेशीर सर्वेक्षण सुरू केल्याचा आरोप समितीने केला आहे. कोप्रोलीत झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. आपल्या हक्काच्या जमिनी वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शवली आहे.
या आंदोलनाप्रसंगी समितीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर ठाकूर, ॲड. पर्जन्य म्हात्रे, विपुल म्हात्रे, शशिकांत पाटील, प्रवीण म्हात्रे यांच्यासह अमेय पितळे, दिलीप म्हात्रे, हितेश म्हात्रे, अमृत म्हात्रे, निलेश म्हात्रे, धनेश म्हात्रे, अनिकेत ठाकूर, ओमकार गावंड, हर्षद पाटील, ओंकार म्हात्रे, सौरव पाटील, नमोद म्हात्रे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
