• Fri. Apr 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली; बंद डंपिंग ग्राउंडवर पुन्हा बेकायदेशीर कचरा

ByEditor

Apr 10, 2026

नगरसेविका प्रमिला पवार यांची मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार; ‘NAD’ कडून कचरा येत असल्याचा खळबळजनक आरोप

उरण । घन:श्याम कडू
उरण नगरपरिषद हद्दीतील श्री. हरिश्चंद्र गावंड उद्यानामागील ज्या डंपिंग ग्राउंडला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायमस्वरूपी बंद करण्यात आले होते, त्याच ठिकाणी आता पुन्हा बेकायदेशीरपणे कचरा टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत नगरसेविका सौ. प्रमिला संतोष पवार यांनी उरण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आणि प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन होत असल्याने हे डंपिंग ग्राउंड यापूर्वीच बंद करण्यात आले होते. मात्र, तरीही काही अज्ञात व्यक्तींमार्फत या ठिकाणी पुन्हा कचरा टाकला जात असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे, हा कचरा ‘एनओडी’ (नेवल आर्मामेंट डेपो) येथून कचरा भरलेल्या गाड्यांद्वारे आणून टाकला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

हा प्रकार केवळ पर्यावरणासाठी घातक नसून थेट न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारा आहे, अशी टीका आता सर्वस्तरातून होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका प्रमिला पवार यांनी प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून हे बेकायदेशीर डंपिंग थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा आणि ‘एनओडी’ कडून कचरा येत असल्यास त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. सदर तक्रारीच्या प्रती नगराध्यक्ष व उरण पोलीस ठाण्यासही देण्यात आल्या असून, आता प्रशासन यावर काय पावले उचलते आणि न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी कशी करते, याकडे उरणकरांचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!