• Sat. Apr 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोठ परिसरात महावितरणकडून वृक्षतोड; निसर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट

ByEditor

Apr 11, 2026

देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

धाटाव । शशिकांत मोरे
सध्या जगभरात ग्लोबल वॉर्मिंगचे संकट गडद होत असून उष्णतेची दाहकता कमालीची वाढली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात असतानाच, रोहा तालुक्यातील रोठ परिसरात महावितरणने निसर्गाचा मोठा ऱ्हास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोलाड-रोहा रस्त्यावर पावसाळापूर्व वीज देखभाल-दुरुस्तीचे काम करताना महावितरणकडून अनेक मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आल्याने निसर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

वीज वितरणाचे जाळे जंगल आणि डोंगराळ भागातून पसरलेले असल्याने तांत्रिक कारणास्तव झाडे-झुडपे कापणे अपरिहार्य असते. मात्र, दरवर्षीप्रमाणे केवळ फांद्यांची छाटणी करण्याऐवजी यंदा महावितरणने अनेक पूर्ण वाढलेली मोठी झाडेच तोडून टाकल्याचे चित्र कोलाड-रोहा मार्गावर दिसत आहे. हंगामी कामगारांच्या माध्यमातून हे काम करताना निसर्गाचे होणारे नुकसान टाळण्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे पर्यावरणाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.

निसर्गाची हानी करूनही या भागातील विजेची समस्या मात्र सुटलेली नाही. धामणसई पंचक्रोशी ते मेढा परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून विजेच्या लपंडावाचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून तर पहाटेच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने लहान मुले आणि वृद्धांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाबाबत स्थानिकांनी वेळोवेळी सत्ताधारी राजकारण्यांकडे तक्रारी मांडल्या, परंतु परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. वाढलेल्या राजकीय वर्चस्वात स्थानिक पुढाऱ्यांच्या मागणीला त्यांच्याच नेत्यांकडून केराची टोपली दाखवली जात असल्याची चर्चा आता परिसरात रंगू लागली असून, महावितरणच्या या मनमानी कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!