• Sat. Apr 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बोर्लीपंचतनची वाहतूक कोंडी फुटणार; पोलिसांच्या पुढाकाराने व्यापाऱ्यांचे ‘नियोजन’

ByEditor

Apr 11, 2026

दिघी सागरी पोलिसांची महत्त्वाची बैठक | ठरवून दिलेल्या वेळेतच मालवाहू वाहनांना प्रवेश

दिघी । गणेश प्रभाळे
श्रीवर्धन तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या बोर्लीपंचतन शहरातील मुख्य रस्त्यावरील रखडलेली वाहतूक आता मोकळा श्वास घेणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक आणि पर्यटकांना मनस्ताप देणाऱ्या वाहतूक कोंडीवर दिघी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी ठोस उपाययोजना आखल्या असून, व्यापाऱ्यांच्या समन्वयाने आता शहराचे वाहतूक नियोजन बदलले जाणार आहे.

पर्यटन हंगामामुळे वाढला ताण

दिवेआगर, दिघी आणि श्रीवर्धनकडे जाण्यासाठी बोर्लीपंचतन हा मुख्य मार्ग असल्याने येथे पर्यटकांची मोठी रेलचेल असते. त्यातच सध्या पर्यटन हंगाम जोरात सुरू असून, खरेदीसाठी येणारे ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि एसटी महामंडळाच्या बस यामुळे या अरुंद रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. बाजारपेठेतील बेकायदा पार्किंग आणि कोणत्याही वेळी उभी राहणारी मालवाहू वाहने ही या कोंडीची मुख्य कारणे ठरत होती.

व्यापाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा

वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत सपोनि संतोष आवटी यांनी नुकतीच बोर्ली शहरातील व्यापाऱ्यांची एक विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत व्यापाऱ्यांनी मालवाहू ट्रक पार्किंग करण्याबाबत सहकार्य करण्याचे मान्य केले.

पोलिसांनी सुचवलेले नवीन नियम:

माल उतरवण्याची वेळ: व्यापाऱ्यांनी दुपारी (कमी गर्दीच्या वेळी) मालाची चढ-उतार करावी.

नियोजित पार्किंग: एकाच वेळी अनेक किराणा मालाचे ट्रक रस्त्यावर उभे करू नयेत.

विकेंडला बंदी: दिवेआगरला पर्यटकांची गर्दी वाढते, त्यामुळे शनिवार-रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी मालवाहू ट्रक बोलावू नयेत.

“बोर्लीपंचतन हे पर्यटनाचे प्रवेशद्वार आहे. येथील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी व्यापाऱ्यांचे सहकार्य मोलाचे आहे. नव्या नियोजनामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांचा प्रवास सुसह्य होईल.”
— संतोष आवटी,
प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, दिघी सागरी पोलीस ठाणे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!