प्रशासनाचा हुकूमशाही कारभार सुरू असल्याचा आरोप; शरद पवार गटाचा आंदोलनाचा इशारा
धाटाव । शशिकांत मोरे
रोहा तालुक्यात महावितरण कंपनीने ग्राहकांना विश्वासात न घेता प्रीपेड मीटर बसवण्याचा धडाका सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या मीटरमुळे सर्वसामान्यांचे जीवन अंधारमय होण्याची भीती व्यक्त होत असतानाच, स्थानिक लोकप्रतिनिधींनी या ज्वलंत प्रश्नावर बाळगलेल्या मौनामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सध्या रोहा तालुक्यात प्रीपेड मीटर बसवण्यावरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे अधिकारी शासनाच्या परवानगीचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे शासनाचा असा कोणताही अधिकृत ‘जीआर’ नसल्याचे बोलले जात आहे. या मीटरमुळे भविष्यात वीजदर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातील, अशी भीती नागरिकांना वाटत आहे. “देशात लोकशाही आहे की अदानी-अंबानींचे राज्य येत आहे?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. या गंभीर परिस्थितीवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) रोहा तालुकाध्यक्ष तुषार खारिवले यांनी स्थानिक आमदार-खासदारांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. लोकप्रतिनिधींची अवस्था ‘सुस्तावलेल्या अजगरासारखी’ झाली असल्याची तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याप्रमाणेच वीज ही आता मूलभूत गरज बनली आहे. मात्र, महावितरण कंपनी सुविधा देण्याऐवजी केवळ वसुलीवर भर देत असल्याचा आरोप होत आहे. पूर्वी तीन महिन्याला येणारे ३००-४०० रुपयांचे बिल आता एका महिन्याला १५०० ते २००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. “घराच्या किराणा सामानापेक्षा जास्त पैसे वीज बिलावर खर्च करावे लागत आहेत,” अशी व्यथा सामान्य नागरिक मांडत आहेत. त्यातच प्रीपेड मीटरचा वेग अधिक असणे आणि रिचार्ज संपताच वीज खंडित होणे या तांत्रिक बाबींमुळे गरिबांना अंधारात राहावे लागणार आहे.
महावितरणच्या कारभाराचा सावळा गोंधळ केवळ मीटरपुरता मर्यादित नसून, कोलाड सारख्या भागात रात्री-अपरात्री कर्मचारी उपलब्ध नसतात आणि कार्यालयाला चक्क कुलूप लावलेले असते. “हे कार्यालय आहे की अधिकाऱ्यांची खाजगी मालमत्ता?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. केवळ सत्तेची मर्जी राखण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप श्री. खारिवले यांनी केला आहे. केवळ विजेचाच नव्हे तर शेतकरी, कामगार आणि वंचितांच्या अनेक प्रश्नांवर इथल्या नेत्यांनी सोयीस्कर मौन पाळले आहे. या अन्यायाविरोधात सामाजिक संघटना आणि शरद पवार गट लवकरच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे संकेतही तुषार खारिवले यांनी दिले आहेत.
