• Sun. Apr 12th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये अडीच लाखांचे हेरॉईन जप्त, तिघांना बेड्या

ByEditor

Apr 12, 2026

तरुण पिढी नशेच्या विळख्यात; सामाजिक संघटनांकडून कठोर कारवाईची मागणी

​उरण | विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या विक्रीने डोके वर काढले असून, पोलिसांनी या नशेच्या बाजारावर आता सर्जिकल स्ट्राईक सुरू केला आहे. जासई परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत उरण पोलिसांनी २ लाख ५२ हजार ८०० रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. याप्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील जासई येथील शीतल परिवहन पार्किंगच्या मागील बाजूस असलेल्या जांभळाच्या झाडाखाली काही तरुण संशयास्पदरीत्या अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली १० एप्रिल रोजी दुपारी २ च्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.

​या कारवाईत पोलिसांनी रवींद्र कल्याण शेट्टी (२७), गणेश दत्तू भिडे (२५) आणि गणेश विनय पाटील (१९) या तिघांना रंगेहाथ पकडले. त्यांची झडती घेतली असता गणेश पाटील याच्याकडे ६.३२ ग्रॅम वजनाच्या हेरॉईनच्या ८५ पुड्या सापडल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या मालाची किंमत २ लाख ५२ हजार ८०० रुपये इतकी आहे.

​पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीचे धागेदोरे कोणाशी जुळले आहेत आणि हा माल कोठून आणला जात होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

​नशेचा विळखा आणि वाढती गुन्हेगारी

​उरणमध्ये सध्या शाळा आणि कॉलेजमधील तरुण मुले मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. चरस, गांजा आणि आता हेरॉईन सारखे घातक पदार्थ उरणमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. व्यसनासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी हे तरुण चोरी, लूटमार आणि इतर गंभीर गुन्हेगारी कृत्यांकडे वळत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उरणमधील कायदा व सुव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

​सामाजिक संस्था आक्रमक

​उरणमधील वाढत्या नशेच्या बाजारावर विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. केवळ विक्री करणाऱ्यांवरच नाही, तर या व्यवसायामागच्या मुख्य सुत्रधारांवरही मोका सारखी कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

​”अमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरुद्ध आम्ही विशेष मोहीम उघडली आहे. उरणला नशामुक्त करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरूच राहतील.”
हनिफ मुलाणी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण पोलीस स्टेशन)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!