नियमबाह्य नियुक्त्या आणि सोयीच्या बदल्यांमुळे लोकप्रतिनिधींसह पालकांमध्ये संताप
म्हसळा । वैभव कळस
म्हसळा पंचायत समितीचा शिक्षण विभाग सध्या गंभीर समस्यांच्या विळख्यात सापडला असून, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे या विभागाचा कारभार पूर्णतः वाऱ्यावर पडला आहे. एकीकडे महत्त्वाची पदे रिक्त असताना, दुसरीकडे उपशिक्षकांना नियमबाह्यरीत्या अधिकारी पदे बहाल करून सोशल मीडियावर त्याचा ‘जल्लोष’ साजरा केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महत्वाच्या सभांकडे अधिकाऱ्यांची पाठ
१ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. पंचायत समितीवर नवीन लोकप्रतिनिधींची नियुक्ती झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या आढावा सभांना गटशिक्षणाधिकारी वारंवार दांडी मारताना दिसत आहेत. विभागाचा दैनंदिन गाडा हाकण्यासाठी सक्षम अधिकारी उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य नागरिक आणि शिक्षकांची कामे खोळंबली आहेत.
नियम धाब्यावर बसवून ‘पदांची खैरात’
शिक्षण विभागात उपशिक्षक आणि विषय शिक्षकांना प्रभारी केंद्रप्रमुख व इतर प्रशासकीय पदे वाटली जात आहेत. विशेष म्हणजे, सर्व शिक्षा अभियानांतर्गत जी पदे १० वर्षांपूर्वीच रद्द झाली आहेत, त्या पदांवर कोणत्या शासन निर्णयाच्या (GR) आधारे नियुक्त्या केल्या जात आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे. हे शिक्षक मूळ अध्यापनाचे काम सोडून पंचायत समितीचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत. नियुक्त्या मिळाल्यानंतर संबंधित शिक्षक सोशल मीडियावर जल्लोष साजरा करत असल्याने शिक्षण क्षेत्रातील गांभीर्य हरवल्याची टीका होत आहे.
बदल्यांमध्ये मनमानी आणि ‘पेसा’चा गोंधळ
तालुक्यातील ‘पेसा’ क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आलेले नाही. डोंगरदऱ्यांच्या या तालुक्यात आधीच शिक्षकांची कमतरता असताना, तडकाफडकी शिक्षकांना कार्यमुक्त केल्याने लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, विषय शिक्षक व पदवीधर शिक्षकांचे समायोजन करताना महिला शिक्षकांना जाणीवपूर्वक अडचणीच्या शाळा देण्यात आल्या, तर मर्जीतील शिक्षकांना सोयीच्या शाळा आणि प्रभारी पदे देऊन ‘खैरात’ वाटली गेल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचा संताप: तोराडी शाळेवर अन्याय
शाळांमधील शिक्षक निवडीचे निकषही संशयास्पद ठरत आहेत. तोराडी बंडवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रशिद कौचाली यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “आमच्या तोराडी शाळेत ३६ विद्यार्थी असून ३ शिक्षक आहेत, तरीही त्यातील एकाला दुसरीकडे पाठवले जात आहे. याउलट, बाजूच्या कुंभळे शाळेत फक्त १ विद्यार्थी हजर असताना तिथे २ शिक्षक नियुक्त आहेत. हा कोणता न्याय? आम्ही वारंवार गटशिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारल्या, पण कोणीही लक्ष देत नाही. आता आम्हाला या अन्यायाविरोधात थेट आमदारांची भेट घ्यावी लागेल.”
वरिष्ठ कार्यालयाने लक्ष देण्याची मागणी
म्हसळा शिक्षण विभागाचा हा ‘रामभरोसे’ कारभार सुधारण्यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने आणि वरिष्ठ शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पालकांमधून आणि सजग नागरिकांमधून केली जात आहे. अन्यथा, तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालावण्यास हा भोंगळ कारभार कारणीभूत ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
