संजीवनी हॉस्पिटलसमोर भीषण अपघात; ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल
पेण | विनायक पाटील
वडखळ-अलिबाग मार्गावर रविवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात मुंबईतील एका ५३ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रेलरने स्कुटीला दिलेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडला असून, या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश चंद्रकांत धुमाळ (वय ५३, रा. मजगाव, मुंबई) हे रविवारी (१२ एप्रिल) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या सुझुकी बर्गमॅन स्कुटीने (क्र. MH-01-FC-3472) अलिबागच्या दिशेने जात होते. वडखळ येथील संजीवनी हॉस्पिटलसमोर आले असता, पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरने (क्र. GJ-39-TB-5174) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धुमाळ हे थेट ट्रेलरच्या मागील चाकाखाली फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. अपघाताची माहिती मिळताच वडखळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी आकाश हिराचंद्र कुथे (३२, रा. पेण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रेलर चालक साजन विनोद कुमार (रा. पूर्वी चंपारण, बिहार) याच्याविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडखळ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनावळे या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. रविवारी सकाळी अपघात झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
