• Tue. Apr 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण: पिरवाडी किनाऱ्यावर पाच पर्यटकांची मृत्यूशी झुंज; सागर सुरक्षा रक्षकांमुळे टळला अनर्थ

ByEditor

Apr 14, 2026

भरतीमुळे खडकांमध्ये अडकले होते पर्यटक; प्रशासकीय उदासीनतेबद्दल संताप

उरण | विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पिरवाडी किनाऱ्यावर सोमवारी संध्याकाळी एक थरारक घटना घडली. समुद्रात फिरायला गेलेले पाच पर्यटक भरती आल्याने खोल पाण्यात खडकांमध्ये अडकले होते. मात्र, किनाऱ्यावर तैनात असलेल्या सागर सुरक्षा रक्षकांनी जीवाची बाजी लावून या पाचही जणांना सुरक्षित बाहेर काढले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

सोमवारी संध्याकाळी काही पर्यटक उत्साहाच्या भरात किनाऱ्यापासून लांब असलेल्या खडकांवर फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान, समुद्राला भरती लागल्याने पाण्याचा वेढा अचानक वाढला. काही वेळातच हे पाचही पर्यटक चहूबाजूंनी पाण्याने वेढले गेले आणि खडकांवर अडकून पडले. पाण्याची पातळी वाढत असल्याचे पाहून पर्यटकांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिथे तैनात असलेल्या सागर सुरक्षा रक्षकांनी तत्परतेने धाव घेत सुरक्षित बचाव मोहीम राबवली आणि पाचही पर्यटकांना सुखरूप किनाऱ्यावर आणले.

प्रशासकीय उदासीनतेचा फटका?

पिरवाडी किनाऱ्यावर वर्षभर पर्यटकांची मोठी मांदियाळी असते. मात्र, येथे प्रशासकीय नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.

इशारा फलकांचा अभाव: किनाऱ्यावर कोठेही धोक्याच्या सूचना देणारे फलक नाहीत. यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना पाण्याचा किंवा खडकाळ भागाचा अंदाज येत नाही.

जीवाशी खेळ: उत्साहाच्या भरात पर्यटक खोल पाण्यात जातात, जे वारंवार अशा अपघातांना निमंत्रण ठरत आहे.

स्थानिकांची मागणी

वारंवार घडणाऱ्या अशा घटनांनंतर आता स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून प्रशासनाकडे आक्रमक मागणी केली जात आहे. “प्रशासनाने तातडीने किनाऱ्यावर ठिकठिकाणी माहिती फलक आणि धोक्याचा इशारा देणारे बोर्ड लावावेत,” अशी मागणी जोर धरत आहे. सोमवारी केवळ सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला असला, तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजनेची गरज व्यक्त होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!