१७ वर्षांच्या निष्ठेनंतरही आश्वासन न पाळल्याने टोकाचे पाऊल; स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराजी
श्रीवर्धन | अनिकेत मोहित
श्रीवर्धन तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण हरिश्चंद्र पावशे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तब्बल १७ वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करूनही पक्षाने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर येत असून, यामुळे स्थानिक भाजप संघटनेत मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
लक्ष्मण पावशे यांनी गेली १७ वर्षे श्रीवर्धनमध्ये भाजपची संघटनात्मक बांधणी आणि विस्तारासाठी प्रामाणिकपणे काम केले. श्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीनंतर त्यांना दोन वर्षांसाठी स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याचे आश्वासन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले होते. मात्र, मोठा कालावधी लोटूनही या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. सातत्याने पाठपुरावा करूनही डावलले जात असल्याने अखेर त्यांनी नाराज होऊन पदाचा त्याग केला आहे.
पावशे यांचा राजीनामा हा श्रीवर्धन भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेतली जात नसल्याची भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे. ऐन राजकीय घडामोडींच्या काळात शहराध्यक्षांनीच राजीनामा दिल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.
पावशे यांच्या राजीनाम्यानंतर अद्याप भाजपच्या जिल्हा किंवा तालुका स्तरावरील नेत्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पावशे यांचा राजीनामा स्वीकारला जाणार की त्यांची समजूत काढून मनधरणी केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लक्ष्मण पावशे यांच्यासारखा निष्ठावान चेहरा पक्षापासून दूर जाणे भाजपसाठी नुकसानकारक ठरू शकते, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
