• Tue. Apr 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह; लोकप्रतिनिधींकडून विनम्र अभिवादन

ByEditor

Apr 14, 2026

उरण | घनःश्याम कडू
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज (१४ एप्रिल) उरणमध्ये अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. उरण नगरपरिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

या सोहळ्याला माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उपनगराध्यक्ष रवी भोईर, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, नगरसेवक राजू ठाकूर, अतुल ठाकूर, अमित पाटील, जसीम गॅस, सायली म्हात्रे, सायली पाटेकर, वंदना पवार, प्रमिला पवार, दमयंती म्हात्रे यांचा समावेश होता.

तसेच उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, शिवसेना (शिंदे गट) चे रमेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, प्रकाश कांबळे, दत्ता म्हात्रे, अकलाख शिलोत्री, मटकर, अकबर आणि पत्रकार संघाचे पदाधिकारी व नगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी सादर केलेले बाबासाहेबांच्या जीवनावरील गीत. त्यांच्या या सादरीकरणाने उपस्थित जनसमुदाय भारावून गेला होता. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या गीताला दाद दिली. केवळ सोहळाच नव्हे, तर बाबासाहेबांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक समतेचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

सकाळच्या सत्रात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी शहरात वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. निळ्या ध्वजांनी आणि ‘जय भीम’च्या जयघोषाने उरण शहर दुमदुमून गेले होते. या जयंती उत्सवामुळे शहरात एकात्मतेचा आणि प्रेरणेचा संदेश पसरला असून नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!