लोकप्रतिनिधींना ‘कुत्र्याची’ उपमा | महाड तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण
महाड | मिलिंद माने
निवडणुकीच्या काळात मतदारांना विकासाची स्वप्ने दाखवायची आणि सत्ता मिळाल्यावर गावाकडे पाठ फिरवायची, या पुढाऱ्यांच्या प्रवृत्तीवर महाड तालुक्यातील रेवतळे-आंग्रे कोंड येथील ग्रामस्थांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रहार केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन तीन महिने उलटले, तरी आश्वासने हवेतच विरल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी गावात थेट बॅनरबाजी केली असून, यात लोकप्रतिनिधींना चक्क ‘कुत्र्याची’ उपमा देण्यात आली आहे. या बॅनरमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
बॅनरमधील बोचरी टीका
गावात लावण्यात आलेल्या या बॅनरवरील मजकूर अत्यंत उपरोधिक आणि विचार करायला लावणारा आहे. त्यावर लिहिले आहे की:
”इलेक्शन आले, इलेक्शन गेले; गावात नेते आले, पुढारी आले, शब्द दिले, आश्वासने दिली. जे मागच्या इलेक्शनला एकमेकांच्या उरावर बसले होते, तेच आता एकमेकांच्या मांडीवर बसले! राहिलेली कामे करू, अर्धवट योजना पूर्ण करू, असे सांगून आज तीन महिने झाले, पण एक ‘कुत्रा’ सुद्धा इकडे बघायला आला नाही. गाव मात्र तिथेच आणि समस्याही तिथेच! गावची लोक अजूनही झोपली आहेत आणि पुढाऱ्यांनी मात्र बघ्यांची भूमिका घेतली आहे. कसं व्हायचं येणारे भविष्य…?”
’लेकी बोले सुने लागे’ असा प्रकार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर विजयी उमेदवारांनी गावातील समस्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निवडणुकीपूर्वी गळ्यात गळे घालून फिरणारे आणि एकमेकांवर टीका करणारे नेते आता सत्तेच्या समीकरणात एकत्र आले असले, तरी जनतेची कामे मात्र रखडलेलीच आहेत. या बॅनरच्या माध्यमातून ग्रामस्थांनी केवळ संताप व्यक्त केला नसून, लोकप्रतिनिधींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकीय चर्चांना उधाण
रेवतळे-आंग्रे कोंड येथील हा बॅनर सध्या सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे. “निवडणुकीत दिलेले शब्द पाळले नाहीत तर जनता अशाच प्रकारे जाब विचारणार,” अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे. या ‘बॅनरबाजी’नंतर आता संबंधित लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने बघणार की पुन्हा दुर्लक्ष करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
