• Wed. Apr 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

​एस.टी. चालकास मारहाण करणाऱ्या तिघांना सक्तमजुरी; माणगाव न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

ByEditor

Apr 15, 2026

माणगाव | सलीम शेख
कर्तव्यावर असलेल्या एस.टी. चालकास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माणगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवून सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे. ५ जून २०१९ रोजी नागोठणे बस स्थानकात ही घटना घडली होती. या खटल्याचा निकाल १५ एप्रिल २०२६ रोजी जाहीर करण्यात आला.

​मिळालेल्या माहितीनुसार, ५ जून २०१९ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास पेण आगाराचे चालक दीपक उमाजी खंडागळे हे पेण-पाली बस (क्र. एमएच ४० एन ८४०१) घेऊन नागोठणे बस डेपोमध्ये प्रवेश करत होते. यावेळी आरोपी आकिब आबिद इलामी याने आपली मोटारसायकल बसच्या समोर आणली. चालकाने मोटारसायकल बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून आरोपी आकिब इलामी, आदिल सलाम पानसरे आणि अरमान अब्दुल रशीद मन्सूरी यांनी चालक खंडागळे यांना अटकाव केला. आरोपी अरमान मन्सूरी याने चालकाला ड्रायव्हर सीटवरून खाली खेचले आणि त्यांचे शर्ट फाडून बेदम मारहाण केली. या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. करांडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. मुकेश के. पाटील यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी पार पडली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता श्री. जितेंद्र डी. म्हात्रे यांनी प्रभावी युक्तिवाद करत उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे विविध निवाडे सादर केले. फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तपासी अंमलदार यांची साक्ष या खटल्यात अत्यंत महत्त्वाची ठरली.

​दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवले. आरोपींना भा.द.वि. कलम ३५३ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व ७ हजार रुपये दंड, कलम ३३२ अन्वये ६ महिने सक्तमजुरी व ७ हजार रुपये दंड आणि कलम ३२३ अन्वये ६ महिने सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या कायदेशीर लढाईत पैरवी अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलणाऱ्यांना या निकालामुळे कडक जरब बसली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!