क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक; कल्याण-मुरबाड दुर्घटनेनंतरही रिक्षा-टॅक्सी चालकांकडून नियमांची पायमल्ली
उरण | घन:श्याम कडू
काही दिवसांपूर्वी कल्याण-मुरबाड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ११ निष्पाप जीवांचा बळी गेला. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असताना, रायगड जिल्ह्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मात्र याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे विदारक चित्र दिसत आहे. जास्तीच्या पैशांच्या हव्यासापोटी प्रवाशांना अक्षरशः कोंबून नेले जात असून, रायगडच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा ‘मृत्यूचा खेळ’ सुरू झाला आहे.
नियमांची सर्रास पायमल्ली
रिक्षाची अधिकृत क्षमता ३ ते ४ प्रवासी, तर टॅक्सीची ६ ते ७ प्रवासी असतानाही, चालक या नियमांना केराची टोपली दाखवत आहेत. विशेषतः उरण, पनवेल आणि नवी मुंबई परिसरात रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी भरले जात आहेत. यामध्ये लहान मुले, महिला आणि वयोवृद्धांच्या सुरक्षिततेचा कोणताही विचार केला जात नसल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाची ‘धोरणशून्यता’ की डोळेझाक?
सर्वात गंभीर बाब म्हणजे, हे सर्व प्रकार पोलिसांच्या आणि वाहतूक यंत्रणेच्या डोळ्यांदेखत सुरू असूनही कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. यापूर्वीही परिसरात अशाच प्रकारच्या ओव्हरलोडिंगमुळे भीषण अपघात झाले आहेत. मात्र, तरीही वाहतूक पोलीस आणि आरटीओ (RTO) विभाग मूग गिळून गप्प का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळेच मुजोर चालकांचे फावले असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
”आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार? कल्याण-मुरबाडसारख्या घटना वारंवार घडत असतानाही कारवाई शून्य आहे. आरटीओ विभागाने या मुजोर चालकांवर तातडीने कठोर कारवाई करून त्यांना वेसण घालावी, अन्यथा भविष्यातील जीवितहानीला प्रशासनच जबाबदार असेल.”
— राकेश पाटील, स्थानिक प्रवासी
दुर्घटनेची टांगती तलवार
उरण-पनवेल मार्गावर सध्या ओव्हरलोड रिक्षांचा सुळसुळाट झाला आहे. “कधीही मोठी दुर्घटना घडू शकते” अशी भीती प्रवाशांमध्ये असूनही संबंधित यंत्रणा केवळ ‘तमाशा’ पाहत असल्याचा आरोप होत आहे. आता तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आरटीओ याकडे लक्ष देऊन धडक कारवाई करणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
