• Wed. Jul 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गटशिक्षणाधिकारी ​’नॉट रिचेबल’; श्रीवर्धनची शिक्षण व्यवस्था वाऱ्यावर?

ByEditor

Jul 14, 2026

​कार्यालय कायम बंद, शिक्षक-पालक त्रस्त; प्रलंबित कामांचा ढिग, वरिष्ठांनी कारवाई करण्याची मागणी

अनिकेत मोहित
​श्रीवर्धन :
तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे चित्र समोर आले आहे. एकीकडे जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक शाळा पटसंख्या घटल्यामुळे अस्तित्वाच्या संकटात सापडल्या आहेत, तर दूसरीकडे तालुक्याच्या शिक्षण विभागाचे प्रमुख असलेले गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण हे कार्यालयात नियमितपणे उपस्थित राहत नसल्याची तीव्र तक्रार शिक्षक, पालक आणि स्थानिक स्तरावरून केली जात आहे. जबाबदार अधिकारीच जागेवर नसल्याने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाल्याचा आरोप होत आहे.

​साहेब नेहमीच गायब; कार्यालयाला कुलूप

​स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अनेकदा कुलूपच पाहायला मिळते. विविध प्रशासकीय आणि शैक्षणिक कामांसाठी कार्यालयात येणारे शिक्षक, मुख्याध्यापक आणि दुर्गम भागातील पालक ‘साहेबांची’ प्रतीक्षा करून अखेर निराश होऊन परत जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, कामकाजाच्या वेळेत संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास गटशिक्षणाधिकाऱ्यांचा मोबाईल अनेकदा ‘नॉट रिचेबल’ लागत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे.

​कामांचा डोंगर रखडला; शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी

​गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या या अनुपस्थितीमुळे तालुक्यातील शिक्षण विभागाचा गाडा रुतल्याचे चित्र आहे. ​शिक्षकांच्या बदल्या, प्रलंबित प्रशासकीय प्रस्ताव आणि हजेरीपट, ​शाळांशी संबंधित विविध मंजुरी आणि दुरुस्तीचे प्रस्ताव, ​विद्यार्थ्यांच्या विविध शासकीय योजनांच्या फाईली आणि शिष्यवृत्तीचे काम ​ही सर्व महत्त्वाची कामे केवळ गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सहीअभावी धूळ खात पडली आहेत. परिणामी, शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण असून याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीत होत आहे.

​घटत्या पटसंख्येच्या काळातच ‘कार्यक्षमते’वर प्रश्नचिन्ह

​सध्या श्रीवर्धन तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या घटण्याची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. अशा बिकट परिस्थितीत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना नियमित भेटी देणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना करणे, पालकांशी संवाद साधणे आणि विभागाच्या कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवणे अपेक्षित होते. मात्र, याउलट परिस्थिती निर्माण झाल्याने शिक्षण विभागाच्या एकूणच कार्यक्षमतेवर नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

​याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या वस्तुस्थितीची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच श्रीवर्धन तालुक्याला पूर्णवेळ, जबाबदार आणि कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

​”गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या अकार्यक्षमतेमुळे श्रीवर्धनमधील शिक्षण व्यवस्था अधोगतीकडे जात आहे. पटसंख्या कमी होत असताना आणि शाळा बंद पडण्याची वेळ येत असताना गटशिक्षणाधिकारीच अनुपस्थित असतील, तर परिस्थिती अधिक गंभीर होईल. अशा कामचुकार अधिकाऱ्याची हयगय केली जाणार नाही. त्यांच्या तातडीने बदलीची मागणी मी वरिष्ठ पातळीवर करत आहे.”
​— सचिन किर (सभापती, पंचायत समिती, श्रीवर्धन)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!