• Thu. Apr 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रेवदंडा खाडी पुलाजवळ सिमेंट मिक्सर ट्रक उलटून भीषण अपघात; चालकाचा बुडून मृत्यू

ByEditor

Apr 16, 2026

रेवदंडा । सचिन मयेकर
रेवदंडा परिसरात गुरुवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला असून, सिमेंट मिक्सर ट्रक थेट खाडीत पलटी झाल्याने चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात चालकासोबत असलेला सहकारी सुदैवाने थोडक्यात बचावला आहे. अरविंदकुमार प्रभाशंकर (३७, रा. उत्तर प्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कुमार प्रभू महतो (३१, रा. बिहार) हे अशोका बिल्डकॉन कंपनीच्या कॅम्पमध्ये वास्तव्यास आहेत. रात्री ११:१५ वाजण्याच्या सुमारास चुनेकोळीवाडा येथील आर.एम.सी. प्लांटवरून सिमेंट घेऊन मिक्सर ट्रक (क्र. MH 01 CR 8226) साईटकडे निघाला होता. चालक अरविंदकुमार याने ओळखीमुळे राहुल यांनाही ट्रकमध्ये बसवून घेतले होते.

रेवदंडा खाडी पूल ओलांडल्यानंतर अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावर रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव मिक्सर ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला थेट खाडीत कोसळला. ट्रक खाडीत पडत असल्याचे लक्षात येताच राहुल महतो यांनी तातडीने खाडीत उडी मारली, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, ट्रक पाण्यात पूर्णपणे पलटी झाला आणि केबिनमध्ये पाणी शिरल्याने चालक अरविंदकुमार हे आतच अडकले. पाण्यात गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात फिर्यादी राहुल महतो यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अपमृत्यू रजिस्टर क्रमांक ५०/२६ नुसार नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पीएसआय एन. आर. अंगज करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!