• Thu. Apr 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन तालुक्यात बिबट्याची दहशत; जावेळे बस स्टॉपजवळ भररस्त्यात दर्शन

ByEditor

Apr 16, 2026

श्रीवर्धन। संदेश घोलप
तालुक्यातील जावेळे बस स्टॉप परिसरातील मुख्य रस्त्यावर काल संध्याकाळी एका मोठ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भररस्त्यात बिबट्या आल्याची ही घटना काल संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली असून, एका जागरूक नागरिकाने हा थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जावेळे गावातील रहिवासी रोहित रांगळे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना अचानक रस्त्याच्या मध्यभागी बिबट्या बसलेला दिसला. रांगळे यांनी प्रसंगावधान राखत आपली गाडी सुरक्षित अंतरावर थांबवली आणि धैर्याने या बिबट्याचे चित्रीकरण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात केले. काही वेळ रस्त्यावर थांबल्यानंतर बिबट्या संथ गतीने चालत जवळच असलेल्या झाडीत अदृश्य झाला.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याच्या चर्चा होत्या, मात्र प्रत्यक्ष दर्शनामुळे आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्य रस्त्यावरच बिबट्या आल्याने पादचारी आणि दुचाकीस्वारांमध्ये घबराट पसरली आहे. वन विभागाने या घटनेची दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी आणि पहाटे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!