• Mon. Apr 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

स्वयंसहायतेतून समृद्धीकडे! कामार्ले-भायमाळा येथील ‘वरदविनायक महिला बचत गटा’ची ध्येयवेडी वाटचाल

ByEditor

Apr 20, 2026

अलिबाग तालुक्यातील कामार्ले-भायमाळा येथील ‘वरदविनायक महिला स्वयंसहायता समूहा’ने आपल्या कष्टाच्या आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे एक नवे शिखर गाठले आहे. शेतमजुरी आणि गरिबीवर मात करत, या गटातील महिलांनी उद्योजकतेच्या क्षेत्रात भरारी घेत इतर महिलांसमोर एक आदर्श उभा केला आहे.

२७ मार्च २०१८ रोजी या समूहाला मिळालेल्या १५ हजार रुपयांच्या फिरता निधीतून या प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मिळालेल्या निधीचा विनियोग समूहातील महिलांनी अत्यंत शिस्तीने केला. त्यानंतर मिळालेल्या १ लाख रुपयांच्या कर्जाचा उपयोग करून महिलांनी मसाले आणि विविध प्रकारची सरबते बनवण्याचा गृहउद्योग सुरू केला. केवळ पारंपरिक उद्योगावर न थांबता, समूहाच्या अध्यक्षा स्मिता वैद्य यांनी स्वतः ‘मिनाकारी वर्क’चे प्रशिक्षण घेतले आणि गटातील इतर महिलांनाही त्यात पारंगत केले. आज या महिला तांब्याच्या वस्तूंवर आकर्षक मिनाकारी करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत.

प्रदर्शने आणि पुरस्कारांची मोहोर

वरदविनायक समूहाच्या उत्पादनांनी आजवर अनेक मोठ्या व्यासपीठांवर आपली छाप पाडली आहे.

कोकण सरस २०१९: प्रदर्शनात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

महालक्ष्मी सरस: २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये सलग सहभाग.

विशेष उपस्थिती: ‘घे भरारी’ या रिॲलिटी शोमध्येही समूहाने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले आहे.

एकूण १० सदस्यांच्या या गटात ७ सदस्य दारिद्र्यरेषेखालील असून ३ पी.आय.पी. सदस्य आहेत. दरमहा १०० रुपये आणि साप्ताहिक २५ रुपये अशी अल्प बचत करून या महिलांनी भांडवल उभे केले आहे. कॉपर मिना वर्क, मसाले, लोणचे आणि ज्यूस हे या गटाचे मुख्य उत्पादने आहेत. अलिबाग-मुंबई महामार्गाच्या सानिध्यामुळे या गटाला मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून अलिबाग येथे जिल्हा स्तरावर स्वतःचे अधिकृत आउटलेट (विक्री केंद्र) सुरू करण्याचा या गटाचा मानस आहे. सध्या त्यांचे मसाले आणि ज्यूस रायगड जिल्ह्यातील विविध आउटलेट्समध्ये वितरित केले जातात. आगामी काळात अलिबाग-मुंबई महामार्गाचा उपयोग विपणनासाठी करून आपला ब्रँड अधिक विस्तारण्याचे नियोजन समूहाने केले आहे.

या सर्व प्रवासात रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले आणि प्रकल्प संचालिका श्रीमती प्रियदर्शनी मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे समूहाकडून सांगण्यात आले.

मनोज सुमन शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!